मुंबई - भाजपचा सहयोगी पक्ष असलेल्या तेलगू देसम पार्टीने (टीडीपी) आंध्र प्रदेशमध्ये मुस्लिम आरक्षणाची ग्वाही दिल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातही मुस्लिम आरक्षणाची मागणी पुढे आली आहे. मुस्लिम समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांत ५ टक्के आरक्षण द्या, अशी मागणी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी आणि रईस शेख यांनी केली आहे.
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाच्या आमदारांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. पत्रात त्यांनी आरक्षणाची मागणी केली आहे. राज्यातले महायुती सरकार इतर जात गटाचे सामाजिक-आर्थिक सर्वेक्षण करीत आहे. मग, टाटा समाज विज्ञान संस्थेकडून करण्यात येणाऱ्या मुस्लिम समाजाच्या सर्वेक्षणात काय अडचण आहे? गेली दीड वर्षे मुस्लिम समाजाच्या पाहणीस महायुती सरकार का वेळकाढूपणा करीत आहे, असा सवाल पत्रात करण्यात आला आहे.
एनडीएमधील भाजपचा सहयोगी पक्ष टीडीपी आंध्र प्रदेशात मुस्लिम आरक्षणाची ग्वाही देत असेल तर राज्यातील महायुती सरकारला ५ टक्के मुस्लिम आरक्षण देण्यात काय अडचण आहे? असा सवाल आमदार शेख यांनी केला आहे.