कारण काय? एकनाथ शिंदेंनी बोलावली आमदारांची बैठक; थोड्य़ाच वेळात सुरु होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2023 08:13 PM2023-07-05T20:13:29+5:302023-07-05T20:13:57+5:30
वर्षा बंगल्यावर मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार की अजित पवारांच्या गटावर होणार? यातून काय निर्णय होणार, शिंदे गटाच्या आमदारांचे पुढे काय होणार असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
ज्या अजित पवार आणि राष्ट्रवादीवर बाण सोडून एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना दगा दिला होता, त्याच अजित पवारांची शिंदे सरकारमध्ये एन्ट्री झाल्याने शिंदे गटात मोठी अस्वस्थता वाढली आहे. गेले वर्षभर रखडवत असलेला मंत्रिमंडळ विस्तार अचानक पवार गटासाठी उरकून घेतल्याने शिंदे गटात नाराजी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी आमदारांना काहीही कारण न सांगता वर्षा बंगल्यावर महत्वाची बैठक बोलावली आहे.
वर्षा बंगल्यावर मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार की अजित पवारांच्या गटावर होणार? यातून काय निर्णय होणार, शिंदे गटाच्या आमदारांचे पुढे काय होणार असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. पुढील निवडणुकीत ९० हून अधिक जागा जिंकणार, कोणत्याही पदाधिकाऱ्यांवर अन्याय, कामे करण्याची जबाबदारी माझी असा शब्द अजित पवारांनी दिला आहे.
शिंदे गटातून देखील धुसफुस सुरु झाली आहे. अनेकांनी राष्ट्रवादीचे आव्हान मिळणार असल्याने पुढील निवडणुकीत काय करायचे यावर चिंता व्यक्त केली आहे. काहींनी आता मंत्री असलेल्यांनी राजीनामे द्यावेत आणि आम्हाला मंत्रिपद द्यावे, अशी मागणी केलेली आहे. बच्चू कडूंनी आम्हाला विश्वासात न घेता अजित पवारांना सोबत घेण्यात आले आहे, असा आरोप केला आहे.
दुसरीकडे ठाकरे गटाने शिंदे आणि अन्य आमदारांवर अपात्रतेची कारवाई होणार आहे, यामुळे हे सगळे सुरु असल्याचा आरोप केला आहे. यामुळे एकंदरीत शिंदे गटाला याचे हादरे बसल्याचे दिसत आहे. काही आमदार ठाकरेंसोबत परत जाण्याच्या विचारात आहेत, असेही दावे केले जात आहेत.