Sharad Pawar News : आमदार नितेश राणेंची भाषणे सध्या वादाचा मुद्दा ठरताना दिसत आहेत. विशिष्ट समाजाविरोधात चिथावणी देणारी भाषणे केल्या प्रकरणी त्यांच्याविरोधात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. नितेश राणेंच्या भाषणांवरून शरद पवारांनी आज भाजपाला खडेबोल सुनावले.
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये शरद पवारांची सभा झाली. या कार्यक्रमात बोलताना पवारांनी नारायण राणे हे माजी मुख्यमंत्री होते. केंद्रीय मंत्री होते असा उल्लेख करत त्यांच्या मुलांच्या भाषेबद्दल भाष्य केले.
शरद पवार म्हणाले, "सत्ता येते आणि जाते. सत्ता ज्याला मिळते, त्याने संयम ठेवायचा असतो. सत्ता असेल, त्यावेळी जमिनीवर पाय ठेवायचे असतात. सत्ता नसेल तर चिंता करायची नसते. काम करत राहायचे."
नारायण राणे यांच्या मुलांबद्दल शरद पवार काय बोलले?
"या जिल्ह्यात एक मुख्यमंत्री होते. ते मुख्यमंत्री सिंधुदुर्गातील होते. अलिकडे मी बघतो, मुख्यमंत्री... मीही मुख्यमंत्री होतो. माझ्या घरातही एक मुलगी आहे. आज देशाच्या पार्लमेंटमध्ये चांगले काम करणारी व्यक्ती म्हणून तिचा लौकिक आहे. विनम्रपणा हे, तिचे वैशिष्ट्य आहे", असे म्हणत पवारांनी सुप्रिया सुळेंचे कौतुक केले.
याच मुद्द्यावर शरद पवार पुढे म्हणाले, "पण, मी अलिकडे बघतो, सिंधुदुर्ग जिल्ह्याने एक मुख्यमंत्री केला. माझ्याबरोबरही त्यांनी काम केले, त्याबद्दल मला काही म्हणायचे नाही. पण, त्यांचे चिरंजीव ज्या पद्धतीने हल्ली बोलतात, ज्या पद्धतीने टीका-टिप्पणी करतात. मी महाराष्ट्राच्या इतिहासात कुठल्याही मुख्यमंत्र्याची पुढची पिढी या प्रकारची झालेली पाहिलेली नाही", असे भाष्य पवारांनी केले.
शरद पवारांनी भाजपला केला सवाल
"आज त्या लोकांची भाषा, ही कशा प्रकारची भाषा आहे? समाजामध्ये सगळ्या जातीचे-धर्माचे लोक असतात. भारत हे राष्ट्र सर्व जातीच्या, भाषेच्या लोकांचे आहे. इथे हिंदू आहेत. इथे मुस्लीम आहेत. इथे शीख आहेत. इथे ख्रिश्चन आहेत. आणि तुमच्या राज्यातील एका केंद्रीय मंत्र्याची मुले मुस्लीम समाजासंबंधी या पद्धतीची जाहीर भाषणे पुन्हा पुन्हा करतात. त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून (भाजपा) केले जात नाही. याउलट टीव्हीवर त्यांना बघावं याची काळजी घेतली जाते. याचा अर्थ स्पष्ट हा आहे की, सत्ता ही डोक्यामध्ये गेलेली आहे. ज्यावेळी सत्ता डोक्यात जाते, लोक एक होतील आणि त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही", असा इशारा शरद पवारांनी भाजपाला दिला.