-बालाजी देवर्जनकर, नागपूरसमाजातील अनिष्ठ प्रथांचे उच्चाटन करण्याच्या हेतूने नागपुरात ‘तान्हा पोळ्या’ला ऐतिहासिक ‘काळी’ व ‘पिवळी’ मारबत काढण्यात येते. पिवळ्या मारबतीसोबत काळ्या मारबतीचीही ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. श्री देवस्थान पंच कमिटीतर्फे इतवारीतून १८८१ पासून ‘काळी मारबत’ची मिरवणूक काढली जाते. जुलमी इंग्रजांच्या कारवायांचा निषेध करण्यासाठी ‘काळी मारबत’ निघण्याची परंपरा सुरू झाली. तर परकीयांच्या गुलामगिरीचे पाश तुटावेत व देश स्वतंत्र व्हावा या देशभक्ती भावनेने प्रेरित होऊन १८८५ मध्ये जागनाथ बुधवारी परिसरात तेली समाजबांधवांनी ‘पिवळी मारबत’ कमिटीची स्थापना केली. तेव्हापासून पिवळी मारबत निघते.नागपूरच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रासाठी गौरवाची परंपरा असलेली मारबत आणि बडग्यांची मिरवणूक यंदा सोमवारी, दि. १० सप्टेंबरला निघेल. पारंपरिक काळी व पिवळी मारबत वाढती रोगराई व समाजात बोकाळलेल्या कुप्रथांना ‘आपल्यासोबत घेऊन जा’, असे सांगणारे ‘बडगे’ या मिरवणुकीचे विशेष आकर्षण असतात. पोळ््याच्या सणाने श्रावण महिना संपत असतानाही या मिरवणुकीत नागपूरकरांच्या उत्साहाला उधाण आलेले असते. ‘घेऊन जा गे मारबत’, अशी घोषणा देत कुप्रथा, कुनिती, भ्रष्टाचाराचा नाश होवो, रोगराई दूर सरो, असे साकडे मारबतीला घातले जाते. ही गौरवशाली परंपरा उपराजधानीने अगदी उत्साहाने जोपासली आहे.
‘घेऊन जा गे मारबत’, नागपूरची ‘मारबत’ व ‘बडगे’ परंपरा नेमकी काय आहे?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2018 4:37 PM