अनिकेत घमंडी, डोंबिवलीभारतीय जनता पार्टीचा पसारा वाढत आहे. पक्ष मोठा होत आहे. मात्र या प्रक्रियेत वर्षानुवर्षे निष्ठावंत राहिलेल्या अनेक जुन्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जात नाही, तर मिस कॉल देऊन सदस्य झालेल्या हवशा-गवशांची काय पत्रास? अशा शब्दांत डोंबिवली, भार्इंदर, बदलापूर आदी भागातील जुन्या कार्यकर्त्यांनी नापसंती व्यक्त केली.‘मिस कॉल सदस्यांचा भाजपाला विसर’ या शीर्षकाचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यावर पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी जुन्या मंडळींनाही सध्या विश्वासात घेतले जात नसल्याची नाराजी प्रकट केली.पक्षाचा पसारा मोठा झाल्याने जुन्या सदस्यांबरोबर संपर्क ठेवण्यास पक्ष विसरला असल्याची तक्रार भार्इंदर येथील सुरेश येवले यांनी केली. एकेकाळी राम कापसे, जगन्नाथ पाटील यांच्या निवडणूक प्रचारात आम्ही पक्षासाठी प्रचंड काम केले होते. त्या वेळी घरोघरी जाऊन कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवण्याची पद्धत आता नामशेष झाली आहे. पक्ष वाढल्याने आता कार्यकर्ता घडवणे, टिकवणे यावर लक्ष देण्यात येत नाही, असे ते म्हणाले. ‘मिस कॉल’ देऊन सदस्य करण्याच्या पद्धतीमुळे कोण सदस्य झाले, ही मंडळी कोणत्या विचारांची आहेत, त्यांना पक्षाबाबत ममत्व आहे किंवा कसे? इतकेच काय प्रत्यक्षात मिस कॉल देणारा माणूस आहे की नाही याची खातरजमा कोणी केली का? ती करण्यासाठी कोणतीही यंत्रणा उभी केलेली नाही. केवळ बैठका, सभा यामध्ये वेळ दवडण्यात येत आहे, असे येवले म्हणाले.नवे कार्यकर्ते पक्षात आणायचे. त्यांना विविध पदे द्यायची. अनेकदा वरिष्ठांशी चर्चा करूनही केवळ गट-तटाचे राजकारण करण्यात नेते दंग असतात. नव्या कार्यकर्त्याला कुठलाही गट माहिती नसतो तरीही त्याला विशिष्ट नेत्याच्या मर्जीतला, त्या गटाचा असे लेबल लावले जाते. यामुळे कार्यकर्ते नाराज होतात, काम करेनासे होतात. पण लक्षात कोण घेतो? अशी संतप्त प्रतिक्रिया दिव्यातील लक्ष्मण भोईर या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. पंतप्रधान मोदींनी घोषणा केलेल्या विविध योजनांबाबत आधी कार्यकर्त्यांना माहिती तर द्या, त्यानंतरच ते सर्वसामान्य नागरिकांना त्याबाबतची माहिती देतील. योजनांचा पाठपुरावा करतील. मात्र घोषणा दिल्लीत होतात त्या गल्लीपर्यंत लोकांच्या मनात रुजवण्यासाठी कोणतीही सक्षम यंत्रणा नाही, अशी खंत बदलापूरमधील कार्यकर्ते किशोर आपटे यांनी व्यक्त केली.
...तर ‘मिस कॉल’वाल्यांची काय पत्रास?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2016 5:47 AM