Ajit Pawar: ...ही काय पद्धत झाली का? शिंदे-फडणवीसांना हे पटतं का? त्या मुद्द्यावरून अजित पवार संतप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 05:18 PM2022-08-16T17:18:57+5:302022-08-16T17:20:31+5:30
Ajit Pawar Criticize Shinde Government: राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे. तसेच शिंदे गटाच्या आमदारांकडून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना देण्यात येत असलेल्या धमक्यांबाबत अजित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे.
मुंबई - राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे. तसेच शिंदे गटाच्या आमदारांकडून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना देण्यात येत असलेल्या धमक्यांबाबत अजित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच राजकारण करताना संस्कार कसे झाले पाहिजेत, हे शिकवणाऱ्या यशवंतराव चव्हाण यांनी घडवलेल्या महाराष्ट्रात तोडा, फोडा, मारा अशा भाषेत धमक्या दिल्या जात आहेत. ही बाब एकनाथ शिंदे यांना पटते का, देवेंद्र फडणवीसांना पटतं, भाजपाला पटतं का, अशी विचारणा अजित पवार यांनी केली आहे.
अजित पवार म्हणाले की, हे सरकार येऊन काही दिवस झाले आहेत. असं असाताना यांच्यातील काही आमदार हे महाराष्ट्रात संघर्ष पेटेल, अशी भाषा बोलताहेत. शिवसैनिकांना ठोकून काढा. हात तोडा, हात तोडता आले नाही तर तंगड्या तोडा, आरे ला कारे म्हणा, कोथळा काढा, अरे ही काय पद्धत झाली का. कुठे शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र, आपले पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, ज्यांनी आपल्याला सुसंस्कृतपणा शिकवला. ज्यांनी नेहमी काम करताना राजकारण करताना संस्कार कसे झाले पाहिजेत, हे शिकवणाऱ्या यशवंतराव चव्हाण यांनी घडवलेल्या महाराष्ट्रात तोडा, फोडा, मारा ही पद्धत, ही बाब एकनाथ शिंदे यांना पटते का, देवेंद्र फडणवीसांना पटतं, भाजपाला पटतं का, असा सवाल अजित पावर यांनी उपस्थित केलाय.
अजित पवार पुढे म्हणाले की, शिंदे गटाच्या एका बहाद्दर आमदाराने सरकराच्या कर्मचाऱ्याला मारलं. म्हणजे तुम्ही कायदा हाती घेऊ लागला आहात. सत्ता आली म्हणजे मस्ती आली आहे का तुम्हाला. शेवटी कुणीही व्यक्ती असली तरी तिला कायदा नियम सारखे आहेत. कायद्यापेक्षा संविधानापेक्षा कुणीही मोठा नाही. या पद्धतीची भाषा अजून सुरुवात झाली नाही, एवढी मस्ती कशी आली आहे. यांना दोन गोष्टी समवजावून सांगण्याचं काम संबंधितांचं नाही का. महाराष्ट्र हे उघड्या डोळ्यांनी बघतोय. १५ ऑगस्ट रोजी एक आमदार अशी भाषा करतोय, तीही मुंबईसारख्या ठिकाणी. मग चांद्यापासून बांद्यापर्यंत सामन्य माणसांची अवस्था काय होईल, असा सवाल अजित पवार यांनी विचारला आहे.