मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यातील वादाची चर्चा सध्या जोरदार सुरु आहे. मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगनाला संजय राऊत यांनी चांगलेच खडेबोल सुनावले. त्याला कंगनानेही प्रत्युत्तर दिल्याने हा वाद आणखी वाढला. यातच संजय राऊत यांनी शनिवारी एका चॅनेलशी बोलताना कंगनाबद्दल अपशब्द उच्चारले. त्यामुळे कंगनाने एक व्हिडीओ पोस्ट करून पुन्हा संजय राऊत यांच्यावर टीकेचा भडीमार केला.
कंगना रणौतवर टीका करताना संजय राऊत यांनी तिच्याबद्दल अपशब्द वापरला. त्यामुळे आज सोशल मीडियावर अनेक सेलिब्रिटींनी आणि विरोधी पक्षांनी संजय राऊत यांना चांगलंच धारेवर धरले. तसेच, याबद्दल निषेध व्यक्त करत अनेक सेलिब्रिटींनी कंगनाची माफी मागावी अशी मागणी केली. तर विरोधी पक्षातील भाजपाने सुशांत प्रकरणावरुन लक्ष हटवण्यासाठी हा प्रकार केला जात असल्याचे म्हटले. मात्र, यावर संजय राऊत यांनी पुन्हा फेसबुकवरून पोस्ट करत माफीची मागणी करणाऱ्यांना आणि विरोधकांना सुनावले आहे.
"माझी ताकद काय आहे, हे त्या लोकांना विचारा, ज्यांच्याजवळ १०५ आमदार असूनही विरोधी पक्षांमध्ये बसले आहेत....जय महाराष्ट्र!" असे म्हणत संजय राऊत यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कंगना राणौत आणि शिवसेना नेते संजयराऊ यांच्यात चांगलेच वाकयुद्ध रंगले आहे.
कंगनाचे राऊतांना प्रत्युत्तर ''संजय जी तुम्ही माझ्याबद्दल अपशब्द वापरले... तुम्ही एक मंत्री आहात आणि हे तुम्हाला माहितच असेल की या देशात तासाला अनेक महिलांवर बलात्कार होत आहे, त्यांच्यावर अत्याचार केला जात आहे, अॅसिड हल्ला केला जातोय. तुम्हाला माहित्येय याला जबाबदार कोण आहे? तुम्ही माझ्याप्रती अपशब्द वापरून जी मानसिकता दर्शवलीत, ही त्याला जबाबदार आहे. या देशातील मुलगी तुम्हाला कधीच माफ करणार नाही,'' असे कंगनाने व्हिडीओत म्हटले.
तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही''मी तुमच्यावर टीका करते, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही. मी 9 सप्टेंबरला मुंबईत येतेय.. तुमचे लोक मला ठार मारू अशा धमक्या देत आहेत. मी सांगते तुम्ही माराच... या देशातील मातीचं कर्ज रक्त सांडूनच निभावता येईल. भेटूया 9 सप्टेंबरला. जय हिंद, जय महाराष्ट्र,''असं आव्हान कंगनाने दिले.
आमीर खान, नसरुद्दीन त्यांना कुणीच काही म्हटलं नाही.''या देशात राहण्याची भीती वाटते, असे जेव्हा आमीर खान म्हटला होता. त्यावेळी कुणीच असे अपशब्द वापरले नाहीत. नसरुद्दीन शाह यांनाही कुणीच प्रत्युत्तर दिलं नाही. मुंबई पोलिसांचे मी कौतुक करताना थकत नव्हती. पण, पालघर साधु हत्या असेल किंवा सुशांत सिंह राजपूत प्रकरण असेल त्यावरून मी त्यांची टीका केली, तर ती माझी अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे,''असेही कंगना म्हणाली.
पाहा ती काय म्हणाली...