रत्नागिरी-सिंधुदूर्ग मतदारसंघामध्ये भाजपाने नारायण राणे यांना उमेदवारी दिल्याने ही लोकसभा निवडणूक चुरशीची झाली आहे. गेल्या दोन वेळेस राणे पुत्राचा दणकून पराभव झाला होता. अशातच आता खुद्द राणे उभे ठाकल्याने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का बसू शकतो. ठाकरेंचे उमेदवार विनायक राऊत यांनी आपणच जिंकणार, २.५ लाख मतांनी जिंकणार असा दावा केलेला आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात चांगला प्रतिसाद मिळत आहे. महाविकास आघाडीचे सर्वच घटक पक्ष माझ्या बाजूने आहेत. उद्धव ठाकरे यांची 28 एप्रिलला रत्नागिरी सभा होईल. उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या रूपाने विजयाचा पहिला पुकार ते देतील. 3 मे रोजी कणकवलीच्या सभेमध्ये ते माझ्या विजयावर शिक्कामोर्तब करतील, असे राऊत म्हणाले आहेत.या लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील गद्दारांचे सरकार पूर्णपणे बरखास्त होईल. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लावली जाईल. पुढच्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिंदे गटाला बाहेर फेकले जाईल. अजित पवारांना सुद्धा कार्य कक्षेबाहेर फेकले जाईल. भाजप स्वतः एकटी लढणार आणि शिंदे शिवसेना आणि अजित पवार यांना लटकवणार आहे, असा दावा राऊत यांनी केला आहे.
मनसेची रत्नागिरीत सभा होऊ दे. मोर नाचतो म्हणून तुडतुडं देखील नाचते. कोणाची तळी उचलत आहे याचे भान ठेवा. मुंबई गुजरातला जोडायचे षडयंत्र सुरू आहे. गद्दारांच्या माध्यमातून धनुष्यबाण संपवण्याचे काम सुरू आहे. कपटी लोकांसाठी मनसे जर पुढे येत असेल तर जनता त्यांची जागा त्यांना दाखवून देईल, असा इशाराही राऊत यांनी दिला.
विनायक राऊत मंत्री पदासाठी हपापलेला नाही. माझी पक्षासाठी निष्ठा कायम आहे. नारायण राणे यांनी मंत्री म्हणून काय दिवे लावले आहेत? असा सवाल करत मंत्री म्हणून काही केलेले नाही आता काय करणार आहेत, असा सवाल उपस्थित केला आहे.