ज्येष्ठ बंधूंकडून पंतप्रधानांची पाठराखण : तेली समाजाला आरक्षण मिळावे
नागपूर : दुष्काळाने होरपळत असलेल्या मराठवाड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकही दौरा न झाल्यामुळे विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. परंतु राज्याचे मुख्यमंत्री सक्षम असताना पंतप्रधानांनी येण्याची आवश्यकता काय आहे, असा प्रश्न पंतप्रधानांचे जेष्ठ बंधू सोमभाई मोदी यांनी उपस्थित केला आहे. नागपूर भेटीवर आले असताना त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृतिमंदिराला भेट दिली. यानंतर प्रसिद्धीमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला.
दुष्काळाच्या मुद्द्यावर पंतप्रधानांवर अकारण टीका होत आहे. ते दिल्लीतूनच सर्व परिस्थिती योग्यपणे हाताळत आहेत. त्यांना मराठवाड्यात येण्याची आवश्यकता नाही. महाराष्ट्र शासनाने प्रभावी काम करावे, असे ते म्हणाले. आरक्षणाच्या मुद्द्यावरुन गुजरातमधील पाटीदार समाजाचे आंदोलन सुरू आहे. परंतु हे आंदोलन जुने आहे. सर्वच समाजाला आरक्षणाची आवश्यकता भासत आहे. तेली समाजालादेखील आरक्षण मिळावे यासाठी आमचा प्रयत्न आहे, असेदेखील सोमभाई मोदी यांनी सांगितले.
मोदी सरकारचे काम समाधानकारक सुरू आहे. अनेक जनहिताच्या योजना सरकारने आणल्या आहेत. परंतु कॉंग्रेस व विरोधक संसद चालू देत नसून यामुळे अनेक मुद्दे प्रलंबित आहेत, या शब्दांत त्यांनी कॉंग्रेसवर टीका केली.