गजानन दिवाण, औरंगाबादब्लू मॉरमॉन या फुलपाखराला सोमवारी राज्य फुलपाखरू म्हणून घोषित करण्यात आले. तर दुसरीकडे राज्य जैवविविधता मंडळ दोन वर्षांपूर्वीच हे छापून मोकळे झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यासदंर्भात संबंधित अधिकारी समाधानकारक खुलासा करु शकले नाहीत़ सदर्न बर्डविंगनंतर आकाराने सर्वात मोठे असलेले हे फुलपाखरू आता राज्य फुलपाखरू म्हणून ओळखले जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वन्यजीव मंडळाच्या बैठकीत सोमवारी हा निर्णय घेण्यात आला. फुलपाखराला असा दर्जा देणारे देशातील हे पहिलेच राज्य ठरले. राज्य शासनातर्फे राज्याचे मानचिन्ह म्हणून राज्य प्राणी शेकरू, राज्य पक्षी हरियल, राज्य वृक्ष आंबा आणि राज्य फूल जरूल घोषित केले आहे. मात्र, राज्याचे फुलपाखरू म्हणून राज्य शासनाने कुठल्याही प्रजातीला जाहीर केले नव्हते. असे असताना महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाने दोन वर्षांपूर्वीच राज्याचे मानचिन्ह म्हणून ‘ब्लू मॉरमॉन’ची घोषणा करून टाकली आहे. ‘जैवविविधता व्यवस्थापन समितीच्या कार्यान्वयासाठी मार्गदर्र्शक तत्त्वे’ या २०१३ साली काढलेल्या तीन क्रमांकाच्या माहितीपुस्तिकेवर त्यांनी शेकरू, हरियल, आंबा, जरूलसह ब्लू मॉरमॉनचेही छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. याच माहिती पुस्तिकेत आतील पानात महाराष्ट्राची नैसर्गिक मानचिन्हे म्हणून आंबा, जरूल, हरियाल, शेकरूसह ब्लू मॉरमॉनचाही उल्लेख केला आहे. शिवाय ‘आपली जैवविविधता ही आपली संपत्ती’ या त्यांच्या चार क्रमांकाच्या माहिती पुस्तिकेवरही त्यांनी ब्लू मॉरमॉनचे छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. अधिकृत घोषणा सोमवारी झाली असताना दोन वर्षांपूर्वीच राज्य जैवविविधता मंडळाने ही घोषणा कशाच्या आधारे केली, असा प्रश्न जैवविविधता मंडळाचे अध्यक्ष डॉ. विलास बर्डेकर यांना विचारला असता, मी महिनाभरापूर्वीच सूत्रे हाती घेतली असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वीच्या निर्णयाबाबत मला काहीही सांगता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले़ यासंदर्भात मंडळाचे सदस्य सचिव आणि अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. दिलीप सिंग म्हणाले, लोकांमध्ये जागृती करण्यासाठी आम्ही हे प्रसिद्ध केले़ अधिकृत घोषणा सोमवारी झाली तर आधीच छापून मोकळे कसे झालात, या प्रश्नावर ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत.
फुलपाखराच्या घोषणेत नवे ते काय!
By admin | Published: June 25, 2015 1:11 AM