मुंबई : महाराष्ट्रातील उद्योग, मुंबईतील वित्तीय संस्था केंद्र तसेच कार्पोरेट कार्यालये गुजरातला पळवली जात असल्याचा आरोप होत असताना गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी मुंबई दौरा केला. आपले उद्योग गुजरात पळवत असल्याचा आरोप करत त्यांच्यासाठी पायघड्या कशासाठी, असा सवाल विरोधी पक्षांनी उपस्थित केला आहे.
गुजरात सरकारचा ‘व्हायब्रंट गुजरात’ हा महाराष्ट्रातील उद्योजकांना आकर्षित करणारा कार्यक्रम मुंबईत बुधवारी पार पडला. यासाठी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल मुंबईत आले आणि त्यांनी बड्या उद्योजकांची भेट घेऊन गुजरातमध्ये गुंतवणूक करण्याचे आवाहन केले. पटेल यांनी मुंबईत रिलायन्सचे मुकेश अंबानी, टाटा सन्स प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन एन. चंद्रशेखरन, पी अँड जीचे कार्यकारी संचालक ए. व्ही वैद्यनाथन, एस्सार कंपनीचे रुईया यांच्यासह १३ मोठ्या उद्योगपतींनी भेट घेतली. गुजरातचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात येऊन येथील उद्योग पळवत असल्याची टीका विरोधकांनी केली. आधीच अनेक प्रकल्प गुजरातला गेले, आता आणखी कोण जाणार याकडे लक्ष लागले आहे.
ठाकरेंची टीका -गुजरातचे मुख्यमंत्री मुंबईत आले. गुजरातमध्ये उद्योगधंदे वाढावेत यासाठी हा खटाटोप. पण त्यांना एवढी मेहनत करायची गरजच काय? फक्त एक फोन घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना केला असता, तर त्यांनी आनंदाने कोलांट्या उड्या मारत इकडचे उद्योग तिथे पाठवायच्या कार्यक्रमाला अधिक वेग दिला असता! अशी खोचक टीका आमदार आदित्य ठाकरे यांनी एक्सवरून केली.
फॉक्सकॉन प्रकल्प पळवून गुजरातचे पोट भरले नाही आणि हा प्रकल्प गुजरातला देऊन महायुती सरकारचे खोके भरले नाही, असे दिसते. सरकारी नोकरीत कंत्राटी भरती करा, उद्योग गुजरातला पाठवून खासगी कंपन्यांमधील नोकऱ्या संपवा. - विजय वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते - विधानसभा
जो महाराष्ट्र या देशात उद्योगक्षेत्रात सर्वाधिक व्हायब्रंट होता, त्या महाराष्ट्राला संपवून, मुंबई आणि महाराष्ट्राचे महत्त्व कमी करून तुम्ही व्हायब्रंट गुजरात बनवताय?- संजय राऊत, शिवसेना नेते