मुंबई - राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मंत्रीपदी विराजमान झाले आहेत. तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांच्या प्रत्येकी दोन नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. मात्र अद्याप मंत्रीमंडळाचा विस्तार झाला नसून नेत्यांची मंत्रीपद ठरली नाही. मंत्रीपद निश्चित करण्यात काँग्रेससमोर पेच असून अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण या दोन माजी मुख्यमंत्र्यांना कोणतं मंत्रीपदं द्यायचा हा यक्ष प्रश्न उभा ठाकला आहे.
अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांचे महाविकास आघाडीत स्थान काय, याबाबत अनेकांना उत्सुकता लागली आहे. उभय नेते काँग्रेस कार्यकारणीतील वरिष्ठ नेते आहेत. तसेच दोघांनी मुख्यमंत्रीपद भूषवलेलं आहे. त्यामुळे या दोघांना कोणत मंत्रीपद द्यायचं यावर काँग्रेस नेतृत्वासमोर पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र दिल्लीतून पृथ्वीराज चव्हाण यांना प्राधान्य दिलं जावू शकतं अशीही शक्यता आहे.
दरम्यान पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकसभा, राज्यसभा, केंद्रीयमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून काम पाहिलेले आहे. मात्र मित्रपक्षांशी जुळवून घेणे हा त्यांच्यासमोर नेहमीच कळीचा मुद्दा राहिलेला आहे. तर तीन पक्षांच सरकार असताना जुळवून घेण्याची क्षमता यासह प्रशासकीय अनुभव आणि संघटन कौशल्य यामुळे अशोक चव्हाण यांचं पारड जड दिसत आहे.
एकूणच पेचात दोन्ही नेत्यांना मंत्रीपद मिळणार की, एका नेत्याला मिळणार हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र दोन चव्हाणांपैकी कोणत्या चव्हाणांना संधी मिळते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.