मुंबई: जवळपास महिनाभराच्या संघर्षानंतर राज्यात सरकार स्थापन झालं. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं महाराष्ट्र विकास आघाडी स्थापन केली. यामध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा मोठा वाटा होता. शिवसेना आणि काँग्रेसला एकत्र आणण्याची मोठी जबाबदारी त्यांनी पार पाडली. मात्र आता शरद पवारांनी केलेल्या विधानामुळे राष्ट्रवादी मंत्रिपदांच्या वाटपाबद्दल खरंच समाधानी आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपद देण्यात आलं आहे. मात्र उपमुख्यमंत्र्यांना कोणतेही अधिकार नसतात, असं शरद पवार यांनी एका मुलाखतीत म्हटलं आहे. गेल्या आठवड्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर विधानसभेत महाराष्ट्र विकास आघाडीनं बहुमतदेखील सिद्ध केलं. सरकार सुरळीतपणे चालवण्यासाठी तिन्ही पक्षांनी किमान समान कार्यक्रमदेखील आखला आहे. मात्र उपमुख्यमंत्रिपदावरुन शरद पवारांनी केलेल्या विधानामुळे येत्या काही दिवसांत महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंसोबत तिन्ही पक्षांच्या प्रत्येकी दोन जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र अद्याप मंत्रालयांचं वाटप झालेलं नाही. त्याच पार्श्वभूमीवर शरद पवारांनी उपमुख्यमंत्रिपदावर भाष्य केलं आहे. राष्ट्रवादीला मंत्रिपदांच्या वाटपात काय मिळालं, असा सवाल शरद पवार यांनी 'आज तक' या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत विचारला. 'राष्ट्रवादीकडे शिवसेनेपेक्षा केवळ दोन आमदार कमी आहेत. मात्र आमच्या आमदारांची संख्या काँग्रेसपेक्षा दहानं जास्त आहे. शिवसेनेकडे मुख्यमंत्रिपद आहे. तर काँग्रेसकडे विधानसभा अध्यक्षपद आहे. मात्र माझ्या पक्षाला काय मिळालं? उपमुख्यमंत्र्यांकडे कोणतेही अधिकार नसतात,' असं पवारांनी म्हटलं. मंत्रिपदांच्या वाटपात राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपद मिळालं असलं तरीही पक्षानं अद्याप यासाठी कोणाचंही नाव निश्चित केलेलं नाही.
काँग्रेस-राष्ट्रवादीत धुसफूस; शरद पवारांच्या नव्या विधानामुळे 'बिघाडी'ची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2019 2:02 PM