- सुरेश भटेवरा, नवी दिल्ली
रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंच्या अर्थसंकल्पाचे वर्णन ‘वादे है, वादों का क्या’... असे करता येईल. प्रभू महाराष्ट्रातील. साहजिकच, त्यांच्या दुसऱ्या अर्थसंकल्पात मुंबईसह महाराष्ट्राच्या वाट्याला नेमके काय आले, त्याविषयी सर्वांनाच उत्सुकता होती. मुंबईसाठी एमयूटीपी-३ द्वारे चर्चगेट ते विरार ही पश्चिम, तर छत्रपती शिवाजी टर्मिनस ते पनवेल या मध्य अशा दोन उपनगरीय रेल्वेसाठी दोन उन्नत (एलिव्हेटेड कॉरिडॉर्स) मार्ग निर्माण करण्याची घोषणा त्यातल्या त्यात महत्त्वाची. या दोन्ही उन्नत मार्गांसाठी तातडीने निविदा मागवण्यात येणार आहेत, असे प्रभू यांनी सांगितले. याखेरीज जपानच्या सहकार्याने मुंबई-अहमदाबाद हायस्पीड कॉरीडॉरच्या उभारणीबरोबरच मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. रेल्वे अर्थसंकल्पात मुंबई आणि महाराष्ट्रासाठी प्रत्यक्षात फारशा नव्या घोषणा नाहीत. तरीही आगामी वर्षात उपनगरीय रेल्वेच्या सर्व स्थानकांवरील प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्याची महत्त्वाची घोषणा असल्यामुळे, मुंबईकरांचा प्रवास सुरक्षित व्हावा, याकडे प्रभूंनी अधिक लक्ष दिले, असे म्हणता येईल. चर्चगेट ते विरार आणि सीएसटी ते पनवेल हे दोन्ही मार्ग मेट्रो रेल्वेच्या स्थानकांशी जोडण्याची योजना, तसेच मुंबईच्या सध्याच्या विमानतळापासून व नवी मुंबईच्या प्रस्तावित विमानतळापर्यंत विशेष कॉरीडॉर निर्माण करण्याची योजना जाहीर करण्यात आली. त्यामुळे मुंबईकरांना भविष्यात नवी सोय उपलब्ध होण्याची आशा आहे.