मुंबई, दि. 30 - मुंबईत पावसानं हाहाकार केल्यानंतर आता ढग दाटले की आता हा कोसळणार... त्या आधी घरी परतलेलं बरं... अशी धास्ती अनेकांच्या मनात निर्माण झाली आहे. हवामान खात्याने गेल्या दोन दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला होता तो खरा ठरला आहे. पुढील दोन दिवसही मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे.
या भागातील लोकांनी राहावे सतर्ककोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिधुदुर्ग या जिल्ह्यांना दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच उत्तर मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नंदूरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर आणि पुणे या जिल्ह्यांतही अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे या भागातील लोकांना पुढील दोन दिवस सतर्क राहावे, असे सांगण्यात आले आहे. मराठवाड्यातही अशाच प्रकारचा पाऊस होऊ शकतो, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
स्कायमेटचा पावसाबद्दलचा अंदाज काय?गेल्या चोवीस तासांमध्ये रेकॉर्डब्रेक पाऊस झाल्यानंतर आता आज काही अंशी मुसळधार पावसापासून मुंबईकरांचा सुटका होऊ शकते, असा अंदाज स्कायमेट या हवामानाचा अंदाज वर्तविणाºया खासगी संस्थेने वर्तविला आहे. आज (बुधवारी) अतिवृष्टी होणार नसल्याचे स्कायमेटचे म्हणणे आहे. अतिवृष्टीसाठी लागणारी परिस्थिती आता पुढे सरकली असून, येत्या काळात मुंबईत मुसळधार पाऊस होणार नाही. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असे स्कायमेटच्या हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे.सकाळपासून काही ठिकाणी पाऊस पडला आहे. मात्र मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसासारखी स्थिती आता ओसरल्याचे चित्र आहे. दुपारी मुंबईत काही ठिकाणी पावसाने विश्रांतीही घेतली आहे.
आतापर्यंत या पावसाळ्यात किती पडला मुंबईत पाऊसगेल्या चोवीस तासात मुसळधार पावसाने अनेकांना २६ जुलैच्या महाभयंकर आठवणी जागृत केल्या असून, एकाच दिवसात सांताकृज वेधशाळने 331.4 मिमि पावसाची नोंद केली आहे. तर 1 जानेवारीपासून आतापर्यंत 2333.9 मिमि पाऊस झाला आहे. कुलाबा परिसरात गेल्या चोविस तासांमध्ये 111 मिमि पाऊस झाला असून, यंदाच्या पावसाळ्यात 1725.6 मिमि पाऊस झाल्याची नोंद झाली आहे.
देशभरातील पावसाची स्थिती काय?देशात पाच राज्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असून, काही भागांमध्ये अजूनही पावसाची तूट आहे. जवळपास ७० टक्के भारतात सरासरी पाऊस झाला आहे. गुजरात, पश्चिम राजस्थान, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी, आंध्रप्रदेशचा किनारपट्टीचा भाग आणि पूर्व भारतातील त्रिपुरा, मिझोरम आणि मणिपूर या राज्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. पंजाब, चंडिगढ, राजस्थानचा उत्तरेकडील भाग, दिल्ली, उत्तर प्रदेशातील पश्चिमेकडील भाग, मध्य प्रदेशाचा पूर्वेकडील भाग, महाराष्ट्रातील विदर्भ, दक्षिण कर्नाटक आणि केरळमध्ये पावसाची अद्याप तूट आहे. भारतात आतापर्यंत सरासरी 700.3 मिमि एवढा पाऊस अपेक्षित असतो. त्या तुलनेत 673.8 मिमि एवढा पाऊस झाला आहे.