कल्याण – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने कंबर कसली आहे. त्यात कल्याण लोकसभा मतदारसंघाकडे सगळ्यांचे डोळे लागले आहे. याठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे खासदार आहेत. परंतु मतदारसंघात भाजपानेही आढावा बैठक घेतल्या आहेत. त्यावरून राष्ट्रवादी आमदार रोहित पवार यांनी भाजपावर टीका केली. त्याला मनसेनेही दुजोरात भाजपाचे राजकारण सांगितले.
आमदार रोहित पवार म्हणाले की, श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात तुमची युती असेल तर तुम्ही तिथे बैठका घेण्याचे, चाचपणी करण्याचे काय? भाजपाला केवळ त्यांचा पक्ष, चिन्ह समजते बाकी कुठलेही नेते आणि लोकांचे प्रश्न कळत नाही. अनुराग ठाकूर यांना या मतदारसंघाची जबाबदारी दिली आहे. कारण इथं मुख्यमंत्र्यांचा मुलगा खासदार आहे. त्यामुळे मोठ्या नेत्यांनाच इथली जबाबदारी दिली आहे इतकेच नाही तर मंत्री रविंद्र चव्हाण यांना कदाचित भाजपाकडून इथली लोकसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते असं दबक्या आवाजात बोलले जाते असंही त्यांनी म्हटलं.
तर कल्याण लोकसभा पूर्वीपासून भाजपाची होती. भाजपाचं इथं काय चालत नव्हते तेव्हा आनंद दिघेंनी हा मतदारसंघ खेचून घेतला. परंतु आता भाजपा वरचढ होताना दिसतेय. त्यामुळे ही संधी भाजपा सोडेल असं वाटत नाही. भाजपाची एक पद्धत राहिली आहे. रोहित पवार बोलले ते बरोबर बोललेत. भाजपा नेहमी समोरच्या पक्षाला छोटा करायला बघतो, दाबायला बघतो. त्यांचे म्हणणे रास्त आहे असं समर्थन मनसे आमदार राजू पाटील यांनी रोहित पवारांच्या विधानाला केले. दरम्यान, कल्याण लोकसभेतील वाटाघाटी बघता भाजपा उमेदवाराच्या दिशेने ही वाटचाल होताना दिसतेय असंही पाटील म्हणाले.
रविंद्र चव्हाण-श्रीकांत शिंदे यांच्यात वाद
काही महिन्यांपूर्वी श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या एका विधानामुळे भाजपा-शिवसेना यांच्यातील वाद उफाळून आल्याचे चित्र होते. नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान व्हावेत, लोकसभेला एकत्रित काम करायला हवे. पण, डोंबिवलीतील काही व्यक्ती युतीत मिठाचा खडा टाकण्याचे काम करीत आहेत, मी कल्याणची खासदारकी सोडायला तयार आहे. पण मग त्या जागी तुम्ही तुमचा चांगला उमेदवार सुचवा. मी युतीचे काम करण्यास तयार आहे, अशी आक्रमक भूमिका घेत कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी भाजपा नेत्यांना टोला लगावला होता. त्यानंतर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्या मध्यस्थीने हा वाद शमविण्यात यश आले होते.