Maharashtra Government : आता काय म्हणावं ! महाविकास आघाडी की, 'धर्मनिरपेक्ष हिंदुत्ववादी आघाडी'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2019 02:57 PM2019-11-21T14:57:51+5:302019-11-21T14:59:57+5:30
Maharashtra News : महाविकास आघाडीची स्थापनाच भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी झाली आहे. तो हेतू साध्य झाला तरी विचारधारेचं काय होणार हा प्रश्न समोर येतो. त्यामुळे या आघाडीला महाविकास आघाडी म्हणायचं की, धर्मनिरपेक्ष हिंदुत्ववादी आघाडी हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
मुंबई - राजकारणात केवळ दोनच विचारधारा, त्या म्हणजे सत्ताधारी आणि विरोधपक्ष हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. विधानसभा निवडणुकीत विचारधारेनुसार एकमेकांविरुद्ध लढणारे पक्ष निकालानंतर गुण्यागोविंदाने एकत्र नादण्याची तयारी करताना दिसत आहेत. राज्याच्या राजकारणात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस अशी आघाडी अस्तित्वात येण्याची शक्यता आहे.
शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस या अनोख्या आघाडीला सुरुवातीला महाशिवआघाडी संबोधण्यात आले होते. मात्र या आघाडीच्या वतीने आता हे नाव बदलून महाविकास आघाडी करण्यात आल्याचे वृत्त आहे. परंतु, धर्मनिरपेक्ष आणि हिंदुत्ववादी अशा विचारधारा मिळून अस्तित्वात आलेल्या या आघाडीला महाविकास आघाडी म्हणण्याऐवजी धर्मनिरपेक्ष हिंदुत्ववादी आघाडी म्हणावं का असा प्रश्न उपस्थितत होत आहे.
शिवसेना पक्ष सुरुवातीपासूनच कट्टर हिंदुत्वाचा पुरस्कार करणारा पक्ष आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कायम हिंदुत्वाला प्राधान्य दिले आहे. मात्र हाच शिवसेना पक्ष आता धर्मनिरपेक्ष विचारसणी असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत घरोबा करत आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आपला धर्मनिरपेक्षपणा सोडणार की, शिवसेना कट्टर हिंदुत्ववादाला तिलांजली देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
दरम्यान महाविकास आघाडीची स्थापनाच भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी झाली आहे. तो हेतू साध्य झाला तरी विचारधारेचं काय होणार हा प्रश्न समोर येतो. त्यामुळे या आघाडीला महाविकास आघाडी म्हणायचं की, धर्मनिरपेक्ष हिंदुत्ववादी आघाडी असा प्रश्न अनेकांना पडला आहे.