मुंबई - गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद शहराचं नाव बदलून संभाजीनगर करण्यात यावं ही मागणी जोर धरु लागली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मुद्द्यावरुन विरोधकांनी शिवसेनेला कोंडीत पकडण्याची तयारी केली आहे. मनसेपाठोपाठभाजपानेही सरकारने औरंगाबादचं संभाजीनगर नाव करावं ही मागणी केली आहे.
अलीकडेच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी औरंगाबादचा दौरा केला. त्यावेळी आम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचे वंशज आहोत, औरंगजेबाचे नाही. त्यामुळे औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर झालेच पाहिजे अशी भूमिका मांडली. त्यावरुन बॉलिवूड गायक आणि संगीतकार विशाल दादलानीने भाजपाला टोला लगावला आहे.
याबाबत विशाल दादलानीने ट्विट करुन म्हटलंय की, गेली ५ वर्ष सत्तेत असताना औरंगाबादचं नामकरण झालं नाही. पण काही महिन्यांपूर्वी सत्तेतून पायउतार झाल्यावर सर्कस सुरु झाली आहे. काय साहेब, लोक मूर्ख वाटले का? अशा शब्दात भाजपावर निशाणा साधला आहे.
मागील आठवड्यात राज ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना पत्रकारांनी त्यांना नामकरणाबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले होते की, औरंगाबादचं नाव बदलले तर काय हरकत? चांगले बदल झाले पाहिजेत. अनेकजण आपली भूमिका बदलून सत्तेत गेले आहेत असं सांगत शिवसेनेला टोला लगावला होता. त्यामुळे आगामी काळात औरंगाबादचं संभाजीनगर नाव करण्यावरुन भाजपा-मनसे शिवसेनेला कोंडीत पकडणार हे नक्की आहे.
दरम्यान, औरंगाबादचं नाव संभाजीनगर करावं ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी १९८८ मध्ये मागणी केली होती. अनेकदा आम्ही विरोधात असताना याबाबत पत्रव्यवहार केला होता. यूपीत योगी आदित्यनाथ यांनी प्रयागराज नाव केलं होतं त्यावेळी लोकसभेतही मी हा प्रश्न विचारला होता. पण त्यावर पंतप्रधानांनी उत्तर दिलं नाही. आता ठाकरे सरकार आहे त्यामुळे लवकरात लवकर संभाजीनगर नाव होऊ शकतं. गेल्या २ महिन्यापासून औरंगाबादचं नाव बदलण्याची तयारी सुरु आहे अशी माहिती शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिली होती.