त्यांना ७० वर्षांत जमले नाही, ते नऊ वर्षांत करून दाखविले; जे. पी. नड्डा यांची काँग्रेसवर जोरदार टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2023 10:31 AM2023-05-19T10:31:46+5:302023-05-19T10:32:08+5:30
पुणे : काँग्रेसच्या लोकांनी लिहिणे, वाचणे सोडून दिले आहे, म्हणून त्यांना कळत नाही; पण नरेंद्र मोदींमुळे जगात भारताची ...
पुणे : काँग्रेसच्या लोकांनी लिहिणे, वाचणे सोडून दिले आहे, म्हणून त्यांना कळत नाही; पण नरेंद्र मोदींमुळे जगात भारताची प्रतिष्ठा वाढली. ७० वर्षांत काँग्रेसने केले नाही ते नऊ वर्षांत मोदी सरकारने केले, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी गुरुवारी केले. भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते.
पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे, रावसाहेब दानवे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, माजी मंत्री पंकजा मुंडे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, विनोद तावडे आदींची उपस्थिती होती.
नड्डा म्हणाले की, जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था भारताची आहे. मोबाइल उत्पादनात, रेल्वे, रस्ते, अशा सर्व क्षेत्रांत पुढे आहे. कोरोनाचा फटका जगाला बसला; पण भारताला नाही. कारण मोदींनी संकटाला संधी मानले. राज्य सरकारच्या कामाचेही मोदी यांनी कौतुक केले. मविआ सरकारच्या काळात राज्याचे सर्वाधिक नुकसान झाल्याची टीका त्यांनी केली.
भाजप कार्यकारिणीच्या बैठकीतील पहिल्या सत्रात मोदी सरकारच्या नवव्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित महाजनसंपर्क अभियानाची माहिती देण्यात आली. दुसऱ्या सत्रात मोदी व राज्य सरकारच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. त्यानंतर नड्डा यांचे उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्त्यांसमोर भाषण झाले.
पुरंदर तालुक्यातील माजी आमदार अशोक टेकवडे यांंना भाजपत प्रवेश देण्यात आला.
१.७५ लाख विशेष कार्यकारी अधिकारी येत्या पंधरा दिवसांमध्ये राज्य सरकार पावणेदोन लाख विशेष कार्यकारी अधिकारी नेमणार आहे. त्या माध्यमातून भाजप आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना पदे मिळणार आहेत, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.
महाविजय संकल्प
‘महापालिका निवडणुका राष्ट्रवादीमुळे रखडल्या. महाविकास आघाडी सरकारने प्रभागरचनेसंदर्भात घेतलेला चुकीचा निर्णय आम्ही रद्द केला. त्याविरोधात राष्ट्रवादी न्यायालयात गेली आहे, म्हणून निवडणुकांना उशीर होत आहे,’ अशा शब्दांत त्यांनी विलंबाचे खापर राष्ट्रवादीवर फोडले.