कर्जत : राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गटाच्या दोन दिवसीय राज्यव्यापी शिबिराचा आज समारोप झाला. यावेळी केलेल्या भाषणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेक गौप्यस्फोट करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसंच राष्ट्रवादीचा एक गट सत्तेत सामील होण्यापूर्वी शरद पवारांसोबत काय चर्चा झाली होती, याबाबतही अजित पवारांनी भाष्य केलं आहे. "मी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देतो, तुम्ही सत्तेत जा, असं शरद पवारांनी आम्हाला सांगितलं होतं," असा दावा अजित पवारांनी केला आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या राजकीय आत्मकथेच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन कार्यक्रमात पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भावनिक झाले आणि पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा, यासाठी आंदोलन करू लागले. मात्र पवारांच्या सांगण्यावरूनच ते कार्यकर्ते आंदोलन करत होते, असं अजित पवारांनी म्हटलं आहे. "मी अध्यक्षपदाचा राजीनामा देतो, तुम्ही सुप्रिया सुळे यांना अध्यक्ष करा आणि भाजप-शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी व्हा, असं वरिष्ठांनी आम्हाला सांगितलं होतं. मात्र नंतर त्यांनीच ठाण्याच्या आनंद परांजपे आणि जितेंद्र आव्हाड यांना बोलावून राजीनामा मागे घेण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आंदोलन करायला सांगितलं," असा आरोप अजित पवार यांनी काका शरद पवारांवर केला आहे.
'शरद पवारांची भूमिका धरसोडपणाची, आम्हाला गाफील ठेवलं'
शरद पवारांवर हल्लाबोल करताना अजित पवार यांनी म्हटलं आहे की, "आधी त्यांनी स्वत:च सांगितलं की मी राजीनामा देतो आणि नंतर राजीनामा मागे घेण्यासाठी लोकांना आंदोलने करायला सांगितली. हे नेमकं कशासाठी? भूमिकेबाबत सतत धरसोड करण्यात आली आणि आम्हाला गाफील ठेवण्यात आलं. शपथविधीनंतरही सर्व आमदार आणि मंत्र्यांना भेटायला बोलावलं. सांगण्यात आलं की गाडी ट्रॅकवर आहे. मात्र नंतरही निर्णय घेण्यात आला नाही. मग आमचा वेळ का घालवला?" असा सवालही अजित पवारांनी केला आहे.
दरम्यान, अजित पवारांनी केलेल्या या गंभीर आरोपांना आता शरद पवार गटाकडून कसं प्रत्युत्तर दिलं जातं, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.