लातूर - राज्यभरात शेतकऱ्यांची व्होटबँक तयार करून राजकारण्यांना धडा शिकवू. सोयाबीन, कापसाचे धोरण कोण आणेल, त्याबाबत आश्वासन कोण देईल यावर आमच्याशी कोण चर्चा करणार, निवडणुकीपुरता आमचा वापर होऊ देणार नाही. जो दिर्घकालीन धोरण आणण्याचं काम करेल, सकारात्मक चर्चा करेल तेव्हा आम्ही शेतकरी मिळून पुढचा निर्णय घेऊ असं विधान उद्धव ठाकरेंच्या भेटीवर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिले आहे.
रविकांत तुपकर म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी मला बोलावलं होतं, त्यांनी चर्चेला दिलेल्या निमंत्रणावरून मी गेलो होतो. आम्ही २५ जागांवर शेतकऱ्यांच्या तरूण पोरांना निवडणुकीच्या मैदानात उतरवतोय. जे शेतकऱ्यांसाठी लढतात, भांडतात. पण त्यांनी सांगितले, २५ जागांवर तुम्ही लढण्यापेक्षा आमच्यासोबत या...पण आम्हाला मुद्द्यांमध्ये रस आहे. सोयाबीन, कापसाच्या प्रश्नावर जो कोणता पक्ष चांगले धोरण आणेल, जो कुणी आश्वासन देईल आम्ही त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेऊ. अजून कुठलाही निर्णय झाला नाही. ती प्राथमिक चर्चा झाली. त्यांच्या निमंत्रणावरून आम्ही चर्चेला गेलो होतो. आमच्या प्रभावशाली जागा आहेत, जिथे निर्णायक मते आमच्याकडे आहे. शेतकऱ्यांची ताकद जोपर्यंत राजकीय होत नाही तोपर्यंत या लोकांना कळणार नाही असं त्यांनी सांगितले.
त्याशिवाय शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर स्व. अण्णासाहेब जावळेंच्या पुढाकाराने छावा संघटना स्थापन झाली, आज अण्णासाहेब नाहीत, परंतु त्यांचे पदाधिकारी आज संघटना पुढे घेऊन जात आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही तुकड्या तुकड्यात आंदोलन करण्यापेक्षा एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी संघटना एकत्रित येऊ नये अशी सरकारची भावना आहे. जर सर्व शेतकरी एकत्र आले, आंदोलन केले तर या सरकारला पळताभुई थोडी केल्याशिवाय राहणार नाही. सोयाबीन, कापसाला भाव नाही, वन्य जनावरांचा त्रास आहे. अनेक आंदोलने महाराष्ट्रात झाली परंतु सरकार जाग येत नाही. महात्मा गांधींच्या मार्गाने आंदोलन करून झाले आता येणाऱ्या काळात भगतसिंगाच्या मार्गाने आंदोलन करून सरकारला जाग आणण्याचं काम आम्ही करू असा इशारा रविकांत तुपकरांनी दिला.
दरम्यान, सरसकट शेतकऱ्यांना मदत द्या, हेक्टरची मर्यादा घालू नका. अजितदादांसोबत चर्चा झाली तेव्हा अमित शाहांकडे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ न्या, तिथे सोयाबीन निर्यातीचा, तेलावरील आयात शुल्क वाढवा. आम्ही स्टॉक मर्यादा लावणार नाही म्हणजे सोयाबीनचे दर वाढतील असं सांगितले होते. मात्र अद्याप शिष्टमंडळ गेले नाही. सोयाबीन, कापूस उत्पादकांना दिलासा सरकारने द्यावा नाहीतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पोरांच्या आक्रोशाला सरकारला सामोरे जावे लागेल असंही तुपकरांनी म्हटलं.
...तर नेत्यांना गावबंदी
जो सोयाबीन आणि कापसाचा विषय घेणार नाही अशा नेत्यांना गावबंदी करणार आहोत. शेतकरी नेत्यांना जाब विचारणार. शेतकऱ्यांचे प्रचंड मोठं आंदोलन मराठवाडा, विदर्भ तिथे दौरा करू. शेतकऱ्यांची व्होटबँक तयार करून राजकारण्यांना धडा शिकवणार आहोत असं छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांनी सांगितले.