आपण जे करतोय तो धर्म आहे, अधर्म नाही; शिवसेना फोडण्यावर फडणवीसांनी दिले कर्णाचे उदाहरण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 06:33 PM2023-07-13T18:33:28+5:302023-07-13T18:34:02+5:30
तरीही आम्ही तीन दिवस थांबलो होतो. विश्वास ठेवला होता. आपण गाफिल राहिलो ही चूक केली. - फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भिवंडीतील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात आपण जे करतोय तो धर्म आहे, अधर्म नाही असे सांगितले आहे. उद्धव ठाकरेंचीशिवसेना फोडण्यावरून त्यांनी हे भाष्य केले आहे. त्यापूर्वी फडणवीस यांनी ठाकरेंना अमित शाहंनी मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला नव्हता, हे पुन्हा एकदा स्पष्ट केले.
आम्ही जेव्हा जिंकत होतो, तेव्हा मी नागपुरातून उद्धव ठाकरेंना फोन केला होता की एकत्र पत्रकार परिषद घेऊ. यावर ठाकरेंनी मला मी आता घेतोय तुम्ही नंतर घ्या असे सांगितले होते. त्यांनी आम्हाला सर्व दरवाजे मोकळे असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले होते. मला जेव्हा मध्यरात्री ठाकरेंचा फोन आला तेव्हा त्यांनी मुख्यमंत्री पदाचा फॉर्म्युला ठरल्याचे सांगितले होते. मी शहांना तेव्हाच फोन केला होता, त्यांनी तसे काही ठरले नसल्याचे सांगितले. मी परत उद्धव ठाकरेंना फोन करून हे सांगितले होते. तेव्हा त्यांनी युती शक्य नसल्याचे कळविले होते, असे फडणवीस म्हणाले.
तरीही आम्ही तीन दिवस थांबलो होतो. विश्वास ठेवला होता. आपण गाफिल राहिलो ही चूक केली. ठाकरेंनी आधीच त्याची तयारी केलेली होती. पण आज जे आपण करतोय तो अधर्म नाहीय, तुम्ही त्याची चिंता करू नका, तो धर्म आहे. महाभराताने हेच शिकविले आहे. कर्णाची कवचकुंडले काढून घेतल्याशिवाय कर्णावर विजय मिळविता येणार नाही, हे कृष्णाला माहिती होते. भीष्माला पराभूत करण्यासाठी शिखंडीला उतरविले. सुर्यास्त भासविला, द्रोणाचार्यांना जेव्हा अश्वत्थामा गेला असे सांगायचे होते, तेव्हा नरोवा कुंजरोवा हे सांगताना एवढ्या जोरात शंख वाजविला की त्यांना फक्त अश्वत्थामा गेला एवढेच ऐकायला गेलेले. हा अधर्म नाहीय ही कुटनीती आहे. जेव्हा जेव्हा बेईमानी होईल तेव्हा तेव्हा कुटनीती वापरावीच लागेल, असे फडणवीसांनी ठासून सांगितले.
अनेकजण नैतिकतेचा प्रश्न उपस्थित करत आहेत. कुठे कुठे कुटनीती वापरली तरच युद्धात विजय मिळेल, हे कृष्णाला माहिती होते. लोक म्हणतात दोन पक्ष फोडले, घर फोडले. मला सांगा सुरुवात कोणी केली. पक्ष फोडल्याचे सांगतायत मग मला सांगा शिंदे आणि पवार काय काल राजकारणात आलेले आहेत का? मी त्यांच्यावर मोहिनी घातलीय का? जेव्हा जेव्हा पक्षांत अन्याय होईल तेव्हा तेव्हा शिंदे जन्माला येतील असा इशारा फडणवीस यांनी दिला. शिवसेनेशी इमोशनल युती आहे, राष्ट्रवादीशी राजकीय. कदाचित पुढील १०-१५ वर्षांत ती देखील इमोशनल युती होईल असे फडणवीस म्हणाले.