Jayant Patil Nagpur News:नागपूरमध्ये झालेल्या दंगलीच्या घटनेवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी गृह मंत्रालयाला सुनावले. दंगल पूर्वनियोजित कट करून घडवण्यात आल्याच्या मुद्द्यावरून जयंत पाटील सरकार बरसले. पूर्व नियोजित कट होता, तर तुम्ही काय हजामती करत होतात का?, संतप्त सवाल पाटलांनी विधानसभेत केला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलत असताना गेल्या काही महिन्यांत महाराष्ट्रात झालेल्या दंगलींची आकडेवारी जयंत पाटलांनी सभागृहात सांगितली. २०२४ मध्ये देशात सर्वाधिक दंगली महाराष्ट्रात घडल्या आहेत, असे सांगत त्यांनी चिंता व्यक्त केली.
हेही वाचा >> नागपूर दंगलीतील मुख्य आरोपी फहीम खानवर 'योगी स्टाईल' कारवाई
जयंत पाटील म्हणाले, या दंगली का होतात? कशा होतात?
"२०२४ मध्ये देशात ५९ जातीय दंगली झाल्या. त्यातील १२ दंगली महाराष्ट्रात घडल्या आहेत. २०२२ पासून महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशात जातीय दंगलींमध्ये वाढ झाली. २०२४ मध्ये महाराष्ट्रात १२, गुजरात ५, मध्य प्रदेशात ५ आणि राजस्थानात तीन दंगली झाल्या. या दंगली का होतात? कशा होतात? या महाराष्ट्राचा आकडा एवढा वर जातोय. यातून किती अस्वस्थता आपण खाली तयार केली आहे, काम सरकारने करावं", असा सल्ला त्यांनी महायुती सरकारला दिला.
कुठेतरी बसले असतील ना? पाटलांचा सवाल
नागपूरमध्ये घडलेल्या दंगलीबद्दल जयंत पाटील म्हणाले, "अमरावती परिसरात दंगल झाली. परवा नागपूरला दंगल झाली. आता नागपूरच्या दंगलीत असं सांगण्यात आलं की, हा पूर्वनियोजित कट होता. अरे पूर्वनियोजित कट होता, तर तुम्ही काय हजामती करत होतात का? पूर्व नियोजित कट म्हणजे नियोजन आहे. म्हणजे कुठेतरी बसून केला असेल. कुठेतरी बसले असतील ना?", असा सवाल करत तपास यंत्रणांच्या अपयशावर त्यांनी बोट ठेवलं.
जयंत पाटील पुढे म्हणाले, "पोलीस खाते काय करत होते? पूर्व नियोजित कट जर आधी पकडता आला, तर ते पोलीस खाते. म्हणजे आपणच कबूल करतोय. अचानक झालेली दंगल आपण समजू शकतो. पूर्वनियोजित कट झाला आणि दंगल झाली. नागपूरसारख्या शहरामध्ये दंगल होणं म्हणजे... सगळ्यात शांत प्रवृत्तीची लोक त्या नागपूरमध्ये राहतात. तिथे दंगल घडवून आणली म्हणजे दंगल घडवून दाखवणाऱ्याचं कौतुक आहे", असा उपरोधिक टोला त्यांनी गृह मंत्रालय आणि सरकारला लगावला.
सरकारला चालतंय असा मेसेज जातोय -जयंत पाटील
"सगळ्यात टॉप स्कील वापरलं. एका अर्थाने त्यांचा सत्कारच करायला पाहिजे. तुम्ही ज्या पद्धतीने लोकांच्या भावनाशी खेळ केला म्हणून सरकारने अशा गोष्टींकडे ठामपणे बघितले पाहिजे. सरकारला चालतंय असा अप्रत्यक्ष मेसेज जात आहे. कारण सरकारमध्ये बसलेले लोक देखील वेगवेगळ्या भूमिका घेतात. लोकांना असं वाटायला लागतं की, आपल्याला याचं लायसन्स आहे. त्यामुळे किमान सरकारमध्ये बसणाऱ्यांनी त्याचं उदात्तीकरण करणे, त्याला प्रोत्साहन देणं ही भूमिका घेऊ नये, अशी माझी विनंती आहे", असे म्हणत त्यांनी वादग्रस्त विधाने करणाऱ्या मंत्र्यांनाही अप्रत्यक्षपणे सुनावले.