अजितदादांची गुलाबी गँग महाराष्ट्रात काय करणार? बाबुरावाचे पत्र, जरा इतिहास जाणून घ्या...

By अतुल कुलकर्णी | Published: July 21, 2024 09:24 AM2024-07-21T09:24:51+5:302024-07-21T09:25:08+5:30

१८व्या शतकात युरोपमध्ये गुलाबी रंग हा उच्चवर्गीय स्त्रियांच्या फॅशनमध्ये लोकप्रिय होता. फ्रेंच किंग लुईस पंधरावा याच्या दरबारातही हा रंग खूप लोकप्रिय होता.

What will Ajit pawar's pink gang do in Maharashtra? Baburao's letter, know some history... | अजितदादांची गुलाबी गँग महाराष्ट्रात काय करणार? बाबुरावाचे पत्र, जरा इतिहास जाणून घ्या...

अजितदादांची गुलाबी गँग महाराष्ट्रात काय करणार? बाबुरावाचे पत्र, जरा इतिहास जाणून घ्या...

- अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई

प्रिय अजितदादा, आपल्या पक्षाने गुलाबी रंग सगळीकडे प्राधान्याने वापरायचे ठरवल्याची बातमी वाचली. आपण दहा-पंधरा गुलाबी रंगाचे जॅकेट करून घेतले. आपल्या पक्षाची भूमिका आणि वेगळेपण उठून दिसावे म्हणून आपण एका एजन्सीला हे काम दिले. त्यांच्या सल्ल्यानुसार आपण गुलाबी रंग परिधान करायचे ठरवले, असेही समजले. हे खरे असेल तर आपले अभिनंदन, यानिमित्ताने आपल्याकडे गुलाची रंग सार्वजनिकरित्या सर्वप्रथम कोणी निवडला? त्या मागचा इतिहास काय? याची कारणेही त्यांनी सांगितली असतीलच, नसेल सांगितली तर माहिती असावी म्हणून हा पत्र प्रपंच.

१८व्या शतकात युरोपमध्ये गुलाबी रंग हा उच्चवर्गीय स्त्रियांच्या फॅशनमध्ये लोकप्रिय होता. फ्रेंच किंग लुईस पंधरावा याच्या दरबारातही हा रंग खूप लोकप्रिय होता. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला गुलाबी रंग मुलींसाठी तर निळा रंग मुलांसाठी वापरला जाऊ लागला. १९५० च्या दशकात पॉप संस्कृतीत गुलाबी रंग लोकप्रिय झाला. अभिनेत्री मर्लिन मन्रोने 'जेंटलमेन प्रीफर ब्लॉन्ड्स' (१९५३) या चित्रपटात गुलाबी गाऊन घालून एक आयकॉनिक लूक तयार केला, २०व्या शतकाच्या उत्तरार्धात हा रंग स्त्रियांच्या सक्षमीकरणाचे प्रतीक म्हणून वापरला गेला, २१व्या शतकात या रंगाचा वापर स्तनाच्या कर्करोगाची जनजागृती करण्यासाठीचे प्रतीक म्हणून वापरला गेला. पिंक रिबन चळवळीत याचा वापर झाला. गेल्या दोनशे वर्षात गुलाबी रंगाचे सामाजिक, सांस्कृतिक महत्त्व वाढले आहे आणि त्याचा वापर विविध रूपांत आणि प्रसंगात केला जात आहे.

या रंगाचे महत्त्व वेगळ्या पद्धतीने अधोरेखित केले ते संपत पाल देवी या घरकाम करणाऱ्या महिलेने. त्यांनी एकदा उत्तर भारतातील एका खेड्यात एक पुरुष आपल्या पत्नीला निर्दयपणे मारहाण करताना पाहिले. संपत देवीने त्याला थांबण्याची विनंती केली. मात्र त्याने तिलाही शिवीगाळ केली, दुसऱ्या दिवशी ती बांबूची काठी आणि इतर पाच महिलांसह परत आली आणि त्यांनी त्या बदमाशाला जोरदार मारहाण केली. ही बातमी वणव्यासारखी पसरली आणि लवकरच महिलांनी संपत पाल देवी यांच्याकडे अशाच हस्तक्षेपाची विनंती करायला सुरुवात केली. तिच्या टीममध्ये सामील होण्यासाठी अनेक स्त्रिया पुढे आल्या. २००६ मध्ये तिने ग्रुपमधील सगळ्या महिलांसाठी गुलाबी रंगाची साडी ड्रेस कोड म्हणून निवडली. त्यामुळे या महिलांच्या समूहाला गुलाबी गँग असे नाव पडले. या गुलाबी गँगने अन्याय आणि गैरव्यवहार जिथे होता तिथे जोरदार हल्ला चढवला. एकदा संपत पाल पोलिस ठाण्यात तक्रार द्यायला गेली, तिथल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी तिला शिवीगाळ केली. तेव्हा गुलाबी गँगने त्या पोलिसाच्या डोक्यात काठीने मारहाण केली. दुसऱ्या प्रसंगात एका सरकारी अधिकाऱ्याला त्याच्याच कारमधून ओढून आणले आणि खचलेला रस्ता दाखवून तातडीने दुरुस्त करायला सांगितले. महिलांचे लैंगिक शोषण, महिलांवरील अत्याचार याच्या विरोधात ही गुलाबी गँग उभी राहिली, पुढे त्यावर माधुरी दीक्षितची प्रमुख भूमिका असलेला गुलाबी गँग नावाचा चित्रपटही आला...

दादा, हा सगळा इतिहास सांगण्यामागचे कारण तुमच्या लक्षात आलेच असेल. आपल्या पक्षाने गुलाबी रंग ठळकपणे वापरायचे ठरवले आहे याचा अर्थ आपल्या पक्षाला नेमके काय करायचे आहे? अठराव्या शतकात उच्चवर्गीय महिलांसाठी हा रंग लोकप्रिय होता म्हणून आपल्याला तो हवा आहे का..? की संपत पाल देवी सारखे हातात काठी घेऊन अन्याय, अत्याचाराविरुद्ध लढणाऱ्या महिलांचे प्रतीक म्हणून तो आपल्याला हवा आहे.? की केवळ गुलाबी रंगाचा गाऊन घालणाऱ्या अभिनेत्री मर्लिन मन्रोसारखा गुलाबी रंग वापरून आपल्या पक्षाला आयकॉनिक लूक द्यायचा आहे..? ही तीन उदाहरणे तीन वेगवेगळ्या काळाचे, समाजाचे आणि परिस्थितीचे प्रतिनिधित्व करतात. आपल्याला नेमकी कोणती परिस्थिती हवी आहे? अन्याय, अत्याचाराच्या विरुद्ध लढणाऱ्या महिला सभासद आपल्याला हव्या असतील तर आपल्याच पक्षात ज्या महिला कार्यकर्त्यांवर अन्याय होतो त्यांच्याविरुद्ध कोणी उठून उभे राहायचे? आपल्या पक्षाचे अनेक नेते आपल्या गावातील राजकारणात येऊ इच्छिणाऱ्या महिलांना पुढे येऊ देतात का? रॉबिनहूडसारखी संपत पाल देवी अधिकाऱ्यांवर, पोलिसांवर हल्ला करायला मागे-पुढे पाहत नाही. आपले अनेक कार्यकर्ते बेकायदा कामांसाठी अधिकाऱ्यांशी कसेही वागतात. त्यांच्यावर आपली गुलाबी गैंग लक्ष ठेवणार आहे का.? सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपण आपल्या पक्षात होतकरू, अभ्यासू महिला नेतृत्वाला विधानसभेत संधी देणार आहात का? की त्या महिलांनी संधी मिळाली नाही म्हणून संपत देवीसारखे हातात काठी घेऊन उभे राहणे आपल्याला अपेक्षित आहे?

आपण एकट्यानेच दहा-बारा गुलाबी जॅकेट शिवल्याचेही समजले. आपले बाकीचे नेते गुलाबी जैकेट शिवणार आहेत का? शिवले तर ते घालणार आहेत का? त्यांच्या हातातही आपण काठी देणार आहात का? विधानसभा निवडणुकीत जागा वाटपात जर आपल्यावर अन्याय झाला तर अन्याय करणाऱ्या भाजप आणि शिंदसेनेच्या विरोधात आपली गुलाबी गैंग नेमकी कोणती भूमिका घेणार? प्रश्न खूप आहेत. उत्तरे तुम्हालाच द्यायची आहेत. ज्यांनी आपल्याला हा सल्ला दिला, त्यांचा गुलाबी फुलांचा हार घालून शिवाजी पार्कात सत्कार केला पाहिजे, असे आपल्याला वाटत नाही का? असो. आपल्याला विधानसभेसाठी गुलाबी, गुलाबी शुभेच्छा...
आपलाच बाबूराव

Web Title: What will Ajit pawar's pink gang do in Maharashtra? Baburao's letter, know some history...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.