महाराष्ट्रात भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन होईल. राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमध्ये सहभागी होणार नाही. त्यांनी सरकार स्थापनेकरिता बिनशर्त पाठिंबा दिला आहे. शिवसेनेबरोबरचे नातेही भाजपाने तोडलेले नाही. - अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष, भाजपासरकारमध्ये की विरोधी बाकावर ?पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी महाराष्ट्रात सोडलेला अश्वमेध घोडा बहुमताच्या जादूई आकड्यापर्यंत जाण्यापासून शिवसेनेने रोखला खरा; परंतु सरकारमध्ये सहभागी व्हायचे की विरोधी बाकावर बसायचे, असा पेच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापुढे आहे. निवडणूक प्रचार काळात मोदी व शहांवर केलेल्या टीकेमुळे भाजपा नेत्यांची मने दुखावली गेली आहेत. त्यामुळे शिवसेनेला सोबत घेण्यास अनेकांचा विरोध आहे. तर दुसरीकडे ज्यांच्यावर टीका केली त्यांच्यासोबत कसे जायचे, असा पेच उद्धव यांच्यापुढे आहे. एकसंघ महाराष्ट्र आणि अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद अशा अटींवर ते भाजपा सरकारमध्ये सहभागी होऊ शकतात.पॉवरगेम यशस्वी होईल का ?स्वबळावर सत्ता स्थापन करण्याच्या महत्त्वाकांक्षेपोटी काँग्रेससोबतची आघाडी तोडली खरी, पण मतदारांनी राष्ट्रवादीचा पर्याय साफ धुडकावून लावला. ६२ जागांवरून त्यांना ४१ जागांवर आणले़ त्यामुळे विरोधी बाकावर बसण्याशिवाय दुसरा पर्याय नसताना भाजपाला बाहेरून पाठिंबा देण्याची तयारी दर्शवून शरद पवार यांनी आपला खरा ‘चेहरा’ उघड केला. राष्ट्रवादीने देऊ केलेला पाठिंबा घेऊ नये, असा सल्ला रा. स्व. संघाने भाजपाला दिला आहे. त्यामुळे पवारांनी टाकलेला डाव कितपत यशस्वी होतो, यावरच पवारांची आगामी वाटचाल अवलंबून असेल. सत्तेशिवाय पवार राहू शकत नाहीत, या मान्यतेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.प्रतिमा जपली, पण पक्ष संपविला !
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे स्वत: दक्षिण कऱ्हाडमधून विजयी झाले असले, तरी त्यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या काँग्रेस पक्षाची या निवडणुकीत पुरती वाताहात झाली. स्वत:च्या प्रतिमाप्रेमात असलेल्या चव्हाण यांनी राष्ट्रवादीसाठी टाकलेल्या जाळ्यात ते स्वत:च अडकले. ऐन निवडणुकीच्या पूर्वसंध्येला एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप करून त्यांनी काँग्रेस पक्षाला अडचणीत टाकले. त्यामुळे पक्षश्रेष्ठी त्यांच्यावर नाराज असून, यापुढे कोणतीही मोठी जबाबदारी त्यांच्यावर टाकली जाण्याची शक्यता दिसत नाही. एक साधे आमदार म्हणून त्यांना विधानसभेत विरोधी बाकावर बसावे लागेल.