मुंबई- कडाक्याच्या थंडीतही डोकलाम येथे चिनी सैनिक शक्तिप्रदर्शन करणार असतील तर हिंदुस्थानची भूमिका काय? चीनचे पंतप्रधान मागे एकदा अहमदाबादेत येऊन ढोकळा-फाफडा खाऊन गेले. आता त्यांच्या कानाखाली ‘फाफडा’ काढण्याची वेळ आली आहे. पण तसे घडेल काय?, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून विचारला आहे. डोकलाम विषय थंड झाला होता. तो फक्त चार महिन्यांत का चेकाळला व गुजरात निवडणूक प्रचाराची सांगता होत असतानाच लाल चिन्यांना ही अवदसा का आठवली?, असाही सवाल सामनातून विचारण्यात आला आहे.
सामना संपादकीयमध्ये म्हटलं आहे, डोकलामच्या सीमेवर चिनी सैनिकांची जमवाजमव पुन्हा सुरू झाली आहे. हिंदुस्थानसाठी ही धोक्याची घंटा आहे. शिवाय गुजरात निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात भारतीय जनता पक्षाने प्रचारात पाकिस्तानला घुसवून खळबळ उडवली असतानाच चीनने डोकलाममध्ये पुन्हा डोके वर काढावे ही साधी गोष्ट निश्चितच नाही. गुजरात निवडणुकीतील पाकिस्तानचा ‘हस्तक्षेप’ अदृश्य आहे आणि तो फक्त प्रचारतंत्राचा भाग आहे, मात्र चिनी सैनिकांची डोकलाम सीमेवरील धडक प्रत्यक्षात आहे. २८ ऑगस्ट रोजी हिंदुस्थान व चिनी सैनिकांमधील संघर्ष संपल्याचे जाहीर करण्यात आले. हे सर्व मोदी यांच्या दूरदृष्टीमुळेच शक्य झाले व चीनच्या सीमा संपूर्ण शांत झाल्याचे जाहीर केले. पण आता चार महिने उलटले नाहीत तोच पुन्हा ‘डोकलाम’ वाद पेटू लागला आहे. १८०० च्या आसपास चिनी सैनिकांनी सीमेवर तळ ठोकला असून हेलिपॅडस्, रस्ते, बराकी बनविण्याचे काम जोरात सुरू आहे. चीनने येथे हालचाली वाढवणे हे आमच्या सुरक्षेसाठी धोकादायक आहे. भूतानच्या सीमेवरील डोकलामवर चिन्यांचा आधीपासूनच डोळा आहे. कधी अरुणाचल राज्यात घुसखोरी, कधी लेह-लडाखमध्ये घुसखोरी व आता भूतानच्या सीमेवरील डोकलामवर दावा सांगण्याचा प्रकार म्हणजे हिंदुस्थानला अस्थिर व अशांत ठेवण्याचेच डावपेच आहेत. डोकलाम विषय थंड झाला होता. तो फक्त चार महिन्यांत का चेकाळला व गुजरात निवडणूक प्रचाराची सांगता होत असतानाच लाल चिन्यांना ही अवदसा का आठवली? हे प्रश्न आहेतच. या भागात चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचे नियमित वास्तव्य असले तरी आतापर्यंत कडाक्याच्या थंडीत चिनी सैन्याने तेथे कधीच तळ ठोकला नव्हता. त्यामुळे हिंदुस्थान व भूतानसाठी ही चिंतेची बाब आहे. जी माहिती समोर आली आहे ती धक्कादायक आहे.
डोकलामवर चिनी सैनिकांसाठी १६ बराकी बांधण्यात आल्या आहेत. सहा मोठ्या बोगद्यांचे खोदकाम पूर्ण झाले आहे. २०० तंबू आता नव्याने ठोकण्यात आले आहेत. भूतान आणि सिक्कीमच्या अगदी मध्यभागी जे चुंबी खोरे आहे तेथे हे डोकलाम येते. त्यामुळे कडाक्याच्या थंडीतही डोकलाम येथे चिनी सैनिक शक्तिप्रदर्शन करणार असतील तर हिंदुस्थानची भूमिका काय? चीनचे पंतप्रधान मागे एकदा अहमदाबादेत येऊन ढोकळा-फाफडा खाऊन गेले. आता त्यांच्या कानाखाली ‘फाफडा’ काढण्याची वेळ आली आहे. पण तसे घडेल काय?