मुंबई - राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. या निवडणुकीत भाजपाने ३, शिवसेनेने २, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने प्रत्येकी एक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला आहे. या निवडणुकीत सहावा उमेदवार निवडून आणण्यासाठी शिवसेना-भाजपा यांच्यात थेट लढत आहे. येत्या १० जूनला मतदान होणार असून तत्पूर्वी कुठलाही घोडेबाजार होऊ नये यासाठी सत्ताधारी पक्ष विशेष खबरदारी घेत आहे.
नेमकी राज्यसभेची निवडणूक प्रक्रिया काय असते आणि एखाद्या आमदाराने पक्षाविरोधात जात क्रॉस वोटिंग केले तर काय कारवाई होईल यावर विधान भवनाचे माजी प्रधान सचिव अनंत कळसे यांनी सविस्तर सांगितले आहे. अनंत कळसे म्हणाले की, विधानसभेचे सर्व निवडून आलेले आमदार हे मतदार असतात. राज्यसभेच्या सहा जागांसाठी हे मतदान होणार आहे. विधान भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये हे मतदान पार पडेल. निवडणूक अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली हे मतदान होईल. समजा, २८८ आमदारांनी आपापल्या पक्षातील उमेदवारांना मतदान केले. २८८ मतदारांचे मतदान पात्र असेल असं गृहित धरलं. तर त्याचा कोटा काढला जातो. या मतदानात १ मताची किंमत १०० असते. उमेदवाराला जिंकण्यासाठी ४२ मतांची गरज असते असं त्यांनी म्हटलं.
तसेच या निवडणुकीत पहिल्या पसंतीची मते देणे प्रत्येकाला गरजेचे असते. बाकी पसंतीची मते दिली नाही तरी चालतात. ज्या उमेदवाराला सर्वात कमी मते मिळतील तो या निवडणुकीतून बाहेर होईल. अनेक वर्षांनी राज्यसभेची निवडणूक महाराष्ट्रात होत आहे. १९९८ ला राम प्रधानांवेळी राज्यसभा निवडणूक झाली. त्यात चुरशीची लढत झाली होती. परंतु त्यावेळी खुले मतदान करण्याची पद्धत नव्हती. त्यात काँग्रेसच्या काही मतांमध्ये क्रॉस व्होटिंग होऊन राम प्रधानांचा पराभव झाला होता. विधानसभेच्या कामकाजासाठी व्हिप जारी केला जातो. मतदार कुठल्या उमेदवाराला मत देणार हे पक्ष प्रतिनिधीला दाखवलं जाते. एखाद्या पक्षीय आमदाराने क्रॉस मतदान केले तर सदस्य निलंबन होऊ शकते असं माजी प्रधान सचिव अनंत कळसे यांनी सांगितले.
महाराष्ट्रात सध्या राज्यसभा निवडणुकीचं वारं वाहत आहे. सर्वच पक्षांच्या हालचालींना या निवडणुकीमुळे वेग आला आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या आमदारांना मुंबईत येऊन राहण्याचे आदेश दिले आहेत. तर महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांची आज ट्रायडेंट हॉटेलमध्ये बैठक पार पडत आहे. यंदा अपक्षांच्या मतांवर सर्व गणित अवलंबून असल्याने मोठ्या पक्षांकडून त्यांची मनधरणी करण्याचं काम सुरू आहे. महाराष्ट्रात भाजपने ३ उमेदवार उतरवले आहेत, तर महाविकास आघाडीनं ४ उमेदवार उतरवलेत. महाराष्ट्रात विधानसभेच्या २८८ जागा आहेत. राज्यसभेची एक जागा जिंकण्यासाठी ४२ आमदार हवेत. महाविकास आघाडीकडे १६८ आमदारांचं समर्थन आहेत. यात शिवसेनेचे ५५, राष्ट्रवादीचे ५३ आणि काँग्रेसचे ४४, तर अन्य पक्षांचे ८, ७ अपक्ष आमदारांचा समावेश आहे. तर भाजपकडे १०६ आमदार आहेत. अन्य ७ आमदारांना त्यांना पाठिंबा दिला आहे.