प्रगती जाधव-पाटीलसातारा : कृषिप्रधान देशात शेतकऱ्यांवर आंदोलनाची वेळ येते आणि याकडे इतर समाज ‘शेतकऱ्यांचा प्रश्न’ म्हणत दुर्लक्ष करत असेल तर ते या देशासाठी घातक आहे. आम्ही शेतकऱ्यांनी कुटुंब जगवण्यापुरते पिकवले तर काय होईल? असा सवाल किसान आंदोलनातील एक प्रमुख नेते सरदार व्ही. एम. सिंग यांनी केला. ‘देशातील शेतकऱ्यांनी ही लढाई आरपारची ठरवली आहे. आणखी दोन वर्षे या आंदोलनाला भाजीभाकर पुरविण्याची ताकद लंगरमध्ये आहे,’ असे निर्धारात्मक उद्गारही त्यांनी काढले.
‘उत्तर प्रदेशातील करोडपती शेतकरी’ अशी व्ही. एम. सिंग यांची ओळख सांगितली जाते. राजधानी दिल्लीच्या सीमेवर गाझियाबाद येथे सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याबरोबरच सरकारबरोबर चर्चेच्या फेऱ्या करून शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारे सिंग यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. ते म्हणाले, ‘भारत हा कृषिप्रधान देश आहे. जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांचा लढा हा अवघ्या जनतेचा आहे. पण त्याकडे निव्वळ ‘शेतकऱ्यांचा विषय’ म्हणून बघणे चुकीचे आहे. अनेक पातळ्यांवर अयशस्वी ठरलेले केंद्रातील बोलघेवडे सरकार अद्यापही शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत गंभीर नाही. खासगी कंपन्यांना गालिचा अंथरणाऱ्यांना शेतकऱ्यांकडे यायला आणि त्यांचे प्रश्न समजून घ्यायलाही सवड नाही, हे दुर्दैव आहे. व्यवस्थेत निर्णयाचा अधिकार नसणाऱ्यांची टोळी चर्चेला पाठवून शेतकरी आंदोलकांची क्रूर चेष्टाच चालवली आहे. आंदोलकांचे हरेकप्रकारे मानसिक खच्चीकरण करण्याचे काम सुरू आहे.
तथापि, आम्हीं मागे हटणार नाही. आमच्या अनेक लेकरांनी त्यांचे शिक्षण बाजूला ठेवून या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदविला आहे. माता-भगिनींनीही शेत आणि घराची जबाबदारी स्वीकारून तिथली खिंड लढवली आहे. आमचे मनोबल वाढविण्यासाठी आम्हाला मिळणारी ही ऊर्जा पुरेशी आहे.