मुंबई पालिका निवडणुकीत काय होणार? उद्या निवडणूक लागली तरी उमेदवारी जाहीर करण्यास भाजप तयार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 11:53 AM2022-12-12T11:53:45+5:302022-12-12T11:54:15+5:30
कागदावर काँग्रेसचा एवढा मोठा संघ असूनही मैदानात उतरून खेळायला कोणीही तयार नाही. जबाबदारी घ्यायला कोणी तयार नाही.
-अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई
भाजपसोबत गुजरात गेले. दिल्ली महापालिका आम आदमी पक्षासोबत गेली. आता चर्चा सुरू झाली ती देशातल्या सगळ्यात श्रीमंत महानगरपालिकेची. पंधरा वर्षे दिल्ली महापालिकेत एकहाती सत्ता असणाऱ्या भाजपला आपने पराभवाची धूळ चाखली. मुंबई महापालिकेत अनेक वर्षे सत्ता असणाऱ्या शिवसेनेला पराभवाची धूळ कोण चारणार, यापेक्षा काँग्रेसचे मुंबई महापालिकेत काय होणार? हा प्रश्न जास्त महत्त्वाचा आहे.
भाजपने मुंबईत प्रत्येक विभागाची अभ्यासपूर्ण आखणी पूर्ण करत आणली आहे. कोणत्या वॉर्डात कोणत्या समाजाची, विचाराची, धर्माची, जाणिवांची किती मते आहेत, याचा सखोल अभ्यास भाजपकडे आज तयार आहे. उद्या निवडणुका लागल्या तरी ते उमेदवार जाहीर करू शकतील. कोणाला कोणाच्या विरोधात उभे करायचे? शिवसेनेचे कोणते उमेदवार एकनाथ शिंदेंकडे द्यायचे? कोणाला भाजपच्या तिकिटावर लढवायचे? काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये दुःखी आत्मे कोण आहेत? त्यांना आपल्याकडे घेऊन कसे शांत करायचे? याचे सगळे नियोजन भाजपकडे तयार आहे.
याउलट काँग्रेसमध्ये टोकाची सामसूम आहे. मध्यंतरी दिल्लीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी स्टिअरिंग कमिटीची बैठक घेतली. सगळे प्रभारी त्या बैठकीला उपस्थित होते. मात्र, मुंबई महापालिका निवडणुकीत पक्षाचे स्टिअरिंग कोणाच्या हाती, हे कोणालाही माहिती नाही. काँग्रेसकडे मुंबईत वर्षा गायकवाड, असलम शेख, बाबा सिद्दिकी, नसीम खान, सुरेश शेट्टी हे पाच माजी मंत्री, मिलिंद देवरा हे माजी केंद्रीय राज्यमंत्री आहेत. माजी मुंबई काँग्रेस अध्यक्षांची यादी भलीमोठी आहे. सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण हे तीन माजी मुख्यमंत्री आहेत. शिवाय बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक ज्येष्ठ मंत्री आहेत. कागदावर एवढा मोठा संघ असूनही मैदानात उतरून खेळायला कोणीही तयार नाही. मी मुंबई महापालिकेची जबाबदारी घेतो, असे म्हणत कोणीही पुढे यायला तयार नाही आणि जर कोणी चुकून पुढे आलेच तर उरलेले सगळेजण त्या नेत्याचे ऐकतील अशी स्थिती नाही. भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी एखादी गोष्ट सांगितली तर ती टाळून पुढे जाण्याची हिंमत कोणात नाही. काँग्रेसमध्ये प्रत्येक जण इतका हिम्मतवान आहे की कोणीच कोणाचे ऐकायला तयार नाही.
मल्लिकार्जुन खरगे यांनी स्टिअरिंग कमिटीच्या बैठकीत तुमचे पद पक्के आहे, असे समजू नका. एक महिन्याच्या आत पुढच्या निवडणुकांची ब्ल्यू प्रिंट मला सादर करा, असे आदेश दिले. मात्र ब्लू प्रिंट बनवण्यासाठी मैदानात उतरून काम करावे लागते. बैठका घ्याव्या लागतात. रेकॉर्ड बनवावे लागते. जबाबदाऱ्यांचे वाटप करण्याची गरज असते. पक्षाचे प्रभारी एच. के. पाटील यांनी किती बैठका घेतल्या? एआयसीसीच्या दोन सेक्रेटरींकडे मुंबईचा कारभार आहे. त्यांनी गेल्या काही महिन्यांत मुंबई महापालिकेची कोणती तयारी केली? मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष हा पक्षाचा प्रदेश उपाध्यक्ष असतो. प्रदेश काँग्रेसने मुंबई महापालिकेसाठी नेमकी कोणती व्यूहरचना आखली? कोणते नियोजन केले? कशाचाही हिशेब नाही.
सगळे रामभरोसे सुरू आहे आणि राम भाजपकडे आहे. राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातून भारत जोडो यात्रा काढली. त्या यात्रेने अख्खी मुंबई ढवळून काढता आली असती. मात्र होर्डिंग्जचा खर्च करायचा कोणी? यावरून अख्खी यात्रा संपली तरी मुंबईत दहा-वीसच्या वर बॅनर लागले नाहीत. राष्ट्रवादीचा मुंबईत म्हणावा तेवढा बेस नाही. नवाब मलिक मुंबईत राष्ट्रवादीचे घड्याळ घालून फिरत होते. ते आर्थर रोडवर मुक्कामाला गेले. उद्धव ठाकरे यांना अशा नेत्यांच्या जोरावर महाविकास आघाडीतून उमेदवार उभे करायचे आहेत. शिवसेना-काँग्रेस आघाडी व्हावी, अशी उद्धव ठाकरेंची इच्छा आहे. त्यासाठी महाविकास आघाडीची सत्ता असतानाच नियोजनासाठी बसण्याची विनंती ठाकरेंनी काँग्रेस नेत्यांना केली होती, मात्र काँग्रेसने तेही अजूनपर्यंत तरी फारसे मनावर घेतलेले नाही.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईत बैठकांचा धडाका सुरू केला आहे. उशिरा उठणारे राज ठाकरे अशी ओळख केली गेली, ते राज ठाकरे कधीच कामाला लागले आहेत. कुठे कोण कमजोर, कुठे कोण शिरजोर आहे याची शिरगणती झाली आहे. जशा निवडणुका जाहीर होतील तसे पत्ते खुले होतील. सध्या काँग्रेसमध्ये जे वातावरण आहे ते पाहता दहा वीस जागांच्यावर काँग्रेस गेली तर शिवाजी पार्कवर पेढे वाटावेत, अशी स्थिती आहे.
याचा अर्थ भाजपला मैदान खुले आहे असाही नाही. उद्धव ठाकरे यांच्याविषयी मुस्लीम समाजामध्ये निर्माण होत असलेली सहानुभूती काँग्रेसचा उरलासुरला बेसही संपवून टाकेल. त्याशिवाय भाजपच्या वागण्यामुळे ठाकरेंविषयीची सहानुभूती अजूनही कमी झालेली नाही. एकीकडे ती सहानुभूती कमी करणे आणि दुसरीकडे निवडणुकीचे बिनचूक नियोजन करणे, या दोन्ही पातळ्यांवर भाजप काम करत आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर भाजपच्या जोडीला गुजरातचा निकाल आहे. भाजपचे महाराष्ट्रातले अनेक नेते मधल्या काळात गुजरातला गेले. आता गुजरातची वेळ आहे. मुंबई महापालिकेसाठी गुजरातीबहुल भागात गुजराती नेते येतील. उत्तर भारतीय प्राबल्य असणाऱ्या भागात तिकडचे नेते येतील. प्रत्येकाला काय काम द्यायचे हे ठरलेले आहे. ठाकरेंकडे शाखांचे संघटन तरी आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीकडे या गोष्टीही नाहीत. काँग्रेसमध्ये सेवा दल नावाची एक विंग होती, असे इतिहास सांगतो. ‘तुला कोणी रागवणार नाही. तुला नवीन कपडे घेऊन देऊ. चांगले खाऊ पिऊ घालू. जिथे कुठे असशील तिथून घरी परत ये, आम्ही तुझी वाट पाहत आहोत...’ अशी भावनिक जाहिरात दिली, तरीही सेवा दलाचे कार्यकर्ते मुंबई काँग्रेसच्या घरी परत येणार नाहीत, हे वास्तव आहे. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत काय होईल हे सांगायला राजकीय ज्योतिषांना फार त्रास होणार नाही.