महाराष्ट्रातील सत्ता संघर्षात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. विरोधी पक्ष भाजपने केलेली मागणी राज्यपालांनी मान्य केली आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधानभवन सचिवालयाला पत्र लिहून उद्याच म्हणजेच ३० जून रोजी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, यानंतर एकनाथ शिंदे यांच्या गटानंही हालचाली सुरू केल्या आहे.
“सर्व आमदारांसोबत आम्ही उद्या मुंबईला पोहोचणार आहोत. त्यानंतर जी काही प्रक्रिया आहे त्यात आम्ही सहभागी होणार आहोत,” असं एकनाथ शिंदे म्हणाले. टीव्ही ९ शी साधलेल्या विशेष संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं. फ्लोअर टेस्ट बाबत सर्वश्रृत आहे. आमच्याकडे आता ५० आमदार आहेत. सर्वांना माहित आहे बहुमताला जेवढी संख्या लागते, त्यापेक्षा जास्त आमदार आमच्याकडे आहेत. त्यामुळे आम्ही शिवसेनेचे आमदार आहोत, आम्ही बाळासाहेबांचे, आनंद दिघे यांचे शिवसैनिक आहोत. त्यामुळे उद्या जी काही फ्लोअर टेस्टची प्रक्रिया असेल त्यात आम्ही सहभागी होऊ असंही ते म्हणाले.
३ जुलै रोजी सरकार?राज्यात ३ जुलै रोजी नवीन सरकार स्थापन होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे राज्यात भाजपा आणि शिवसेनेचं सरकार स्थापन करण्याबाबत शिंदे गटाने स्ट्रॅटेजी तयार केल्याची माहिती समोर येत आहे. आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलेलो नाही. सगळ्या आमदारांचे बहुमत आमच्या बाजूने आहे. त्यामुळे आम्हीच खरी शिवसेना, असा स्टँड बंडखोर गट घेणार आहे. त्यामुळे सरकार भाजप-शिवसेनेचे स्थापन होईल, आणि खरी शिवसेना कोणाची हा वाद निवडणूक आयोगाकडे पुढे काही वर्ष चालू राहील, अशी स्ट्रॅटेजी असल्याचे समजते.