लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आमदारांच्या अपात्रतेबाबतचा मुद्दा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे प्रलंबित आहे. अपात्रतेसंदर्भात शिंदे व ठाकरे गटाच्या आमदारांना नोटीस बजावली होती. या आमदारांची सुनावणी पुढील आठवड्यापासून सुरू हाेण्याचे संकेत राहुल नार्वेकर यांनी मंगळवारी दिले.
राहुल नार्वेकर यांनी शिवसेना पक्षाची घटना दोन्ही गटांकडून मागवून घेतली. त्यानंतर त्यांनी नोटीस दिल्याला आता महिना होत आला आहे. ठाकरे गटाच्या १४ आमदारांनी या नोटिशीवर अधिवेशन काळातच उत्तर दिले आहे.
तर शिंदे गटाच्या आमदारांनी मुदतवाढ मागितली हाेती. त्यांना दिलेली दोन आठवड्यांची मुदतही पुढील आठवड्यात संपत आहे. ठाकरे गटाच्या आदित्य ठाकरे आणि ऋतुजा लटके यांना नोटीस दिलेली नाही. शिंदे गटाच्या संतोष बांगर वगळता ३९ आमदारांना नोटीस बजावण्यात आली आहे.