संपूर्ण वाटचालीत एक शिवसैनिक आज राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांची एकूण कारकीर्द आणि स्वभाव बघितला तर, नेत्यांच्या उपलब्धतेचे जे डेफिसिट तयार झाले होते ते दूर होईल. लोकांना आपले नेते आपल्यात हवे, असे सातत्याने वाटत होते. हा नेता जनसामान्यांना उपलब्ध असेल. मुंबईतच नाही, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, एका कॉलवर आणि शेवटच्या माणसाचे प्रश्न सोडवायचा प्रयत्न हा नेता करेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी औरंगाबादचे संभाजीनगर करण्याच्या निर्णयावरही भाष्य केले. ते शिंदे सरकारने बहुमताची अग्नीपरीक्षा जिंकल्यानंतर विधानसभेत बोलत होते. फडणवीस म्हणाले, "भलेही शेवटच्या कॅबिनेटमध्ये तुम्ही काही निर्णय घेतले. खरे तर राज्यपालांचे पत्र आल्यानंतर जोपर्यंत विश्वासमत प्राप्त होत नाही, तोवर कॅबिनेटची मिटिंग घ्यायची नसते, हा संकेत आहे. तरी तुम्ही कॅबिनेटची बैठक घेतली. त्या बैठकीत काही निर्णयही घेतले मग तो संभाजीनगरचा असो, धाराशिवचा असो की तो दि. बा. पाटील यांचा असो किंवा इतरही काही निर्णय असतील. जरी ती कॅबिनेट संकेताप्रमाणे घेता येत नाही, तरी तुम्ही निर्णय घेतले असले तरी, मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितले, की आपलीही भूमिका तीच आहे. आपणही त्याच भूमिकेचे आहोत."
तसेच, यामुळे काळजी करू नका. तुमच्या शेवटच्या कॅबिनेटचे निर्णय पुन्हा कॅबिनेटमध्ये घेऊन ते निर्णय लागू करण्याचे काम हे सरकार करेल, हा विश्वास तुम्हाला देतो. तसेच संपूर्ण सभागृहाच्या वतीने माननीय मुख्यमंत्र्यांचे अतीशय मन:पूर्वक अभिनंदन करतो आणि विरोधी पक्षालाही सहकार्याची विनंती करतो, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.