मुंबई : आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांसाठी रुग्णालये बांधण्याची अट घालत सिडकोने नवी मुंबई महापालिकेकडे काही भूखंड हस्तांतरित केले. मात्र, या अटींचे भंग केल्याने सिडकोने महापालिकेबरोबर केलेला करार रद्द केला. या भूखंडांचे करणार काय? अशी विचारणा करत, उच्च न्यायालयाने सिडको आणि महापालिकेला उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत, तर हिरानंदानी हेल्थ प्रा. लि. ला प्रतिवादी करण्याचे निर्देश याचिकाकर्त्यांना दिले.गरजूंवर किरकोळ दरात उपचार व्हावेत, याकरिता सिडकोने नवी मुंबई महापालिकेला काही भूखंड भाडेतत्त्वावर दिले. नवी मुंबईने हे भूखंड अगदी क्षुल्लक किमतीत हिरानंदानीना दिले. या ठिकाणी रुग्णालय उभारण्यात आले. हिरानंदानी हेल्थ केअर प्रा. लि.ने हे रुग्णालय फोर्टीज् हेल्थ केअर प्रा. लि.ला विकले. यामध्ये गरजूंसाठी राखीव खाटा ठेवण्यात आल्या नाहीत. अटीचा भंग केल्याने सिडकोने नवी मुंबई महापालिकेला भूखंड परत करण्याबाबत नोटीस बजावली आहे.महापालिकेकडून भूखंड परत घेण्यात यावेत व महापालिका अधिकाऱ्यांसह हा भूखंड घेणाऱ्यांवरही फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विनोद गंगवाल यांनी उच्च न्यायालयात केली आहे. या याचिकेवरील सुनावणीत सडिकोच्या वकिलांनी सिडकोने नवी मुंबई महापालिकेला भूखंड परत देण्यासंदर्भात नोटीस बजावली आहे. हे प्रकरण सध्या सरकारकडे प्रलंबित आहे, अशी माहिती उच्च न्यायालयाला दिली. त्यावर खंडपीठाने या भूखंडाचे काय करण्यात येणार, अशी विचारणा सिडकोकडे केली. नवी मुंबई महापालिकेलाही प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश देत, याचिकाकर्त्यांना हिरानंदानी हेल्थ प्रा. लि.ला प्रतिवादी करण्यास सांगितले. (प्रतिनिधी)
रुग्णालयाला दिलेल्या भूखंडाचे काय करणार?
By admin | Published: July 17, 2016 5:14 AM