पुणे : पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी पहिल्यांदाच पुणे दौऱ्यावर येत आहेत. स्मार्ट सिटी योजनेतील प्रकल्पांच्या शुभारंभानंतर ते पुणेकरांशी जाहीर संवाद साधणार आहेत. शहराचे मेट्रोसह अनेक प्रश्न केंद्राकडे प्रलंबित आहेत. या प्रश्नांवर ते बोलणार का, तसेच पुणेकरांसाठी आणखी एखादी मोठी घोषणा करून ते सुखद धक्का देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.देशभरातील १०० शहरे येत्या ५ वर्षांत स्मार्ट करण्याचा संकल्प मोदी सरकारकडून सोडण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यातील योजनेमध्ये देशभरातून दुसऱ्या क्रमांकाने पुणे महापालिकेची निवड झाली आहे. या योजनेंतर्गत १४ प्रकल्पांचा शुभारंभ मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. शहरातील वाहतूककोंडीच्या गंभीर समस्येवर मार्ग काढण्यासाठी मेट्रो प्रकल्पाची घोषणा करण्यात आली आहे. मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचा प्रस्ताव केंद्राकडे अनेक दिवसांपासून धूळ खात पडून आहे. पंतप्रधान पुणे दौऱ्यावर येण्याची घोषणा झाल्यानंतर तातडीने हालचाली होऊन मेट्रोच्या प्री-पीआयबीची मीटिंग पार पडली आहे. मेट्रोला महिनाभरात अंतिम मान्यता मिळण्याची शक्यता आहे. मात्र मेट्रो प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी मेट्रो कंपनीची स्थापना लवकर होणे आवश्यक आहे, तरच मेट्रोचे काम लवकर मार्गी लागू शकणार आहे. पुण्यानंतर प्रस्ताव सादर झालेल्या नागपूर मेट्रोचे काम सुरू झाले असताना, पुणे मेट्रो रखडल्याने पुणेकरांमध्ये नाराजीची भावना आहे. मेट्रोचे काम प्रत्यक्षात सुरू होऊन त्यातून प्रवास कधी करायला मिळणार हा प्रश्न पुणेकरांसमोर आहे. याचे ठोस उत्तर मोदी यांच्याकडून शनिवारी होत असलेल्या कार्यक्रमात मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पुणेकरांना काय मिळणार?
By admin | Published: June 25, 2016 12:57 AM