मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शुक्रवारी सायंकाळी होणाऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात काय बोलतात, याबाबत उत्सुकता आहे. सुमारे १२०० जणांच्या उपस्थितीत षण्मुखानंद सभागृहात हा मेळावा होणार आहे.
राज्यात गेल्या काही महिन्यापासून केंद्रीय तपास यंत्रणांकडून होत असलेली कारवाई, लखीमपूरमधील घटना, महाराष्ट्र बंद, भाजपच्या राज्यातील नेत्यांनी गेल्या काही दिवसात ठाकरे आणि सरकारवर केलेले आरोप यांचा समाचार ते भाषणात घेतील, अशी शक्यता आहे. पुढील वर्षीच्या सुरुवातीला होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा बिगुल उद्धव ठाकरे फुंकतील, अशीही शक्यता आहे. गेली ३० वर्षे या महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे आणि टिकवायचीच या निर्धाराने ते शिवसैनिकांना काय संदेश देतात, हे पाहणेही महत्त्वाचे असेल.
‘महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणाला नवी दिशा देणारा दसरा मेळावा’अशी या मेळाव्याची टॅगलाईन आहे. त्यामुळे राष्ट्रीय राजकारण, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप यांच्यावर ठाकरी शैलीत उद्धव ठाकरे फटकारे असतील, असे मानले जाते. शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांच्याविषयी शिवसेना नेते रामदास कदम यांची कथित ऑडिओ क्लिप, अनिल परब, खा. भावना गवळी यांच्यावर ईडीने केलेली कारवाई, माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी केलेले वक्तव्य याबाबत ठाकरे काय बोलतात, याविषयीदेखील उत्सुकता असेल.