ठाणे/डोंबिवली : हेल्मेटसक्ती लागू व्हावी, यासाठी नो हेल्मेट नो फ्युएल, अशी घोषणा राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिली आणि त्याबद्दल सोशल मीडियासह कॉलेज कट्ट्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. हेल्मेटसक्ती व्हायला हवी, यावर तरुणाईचे एकमत असले तरी पेट्रोल भरण्यापुरत्या सक्तीवर त्यांनी टीका केली आहे. पेट्रोल भरण्यापुरते हेल्मेट घातले आणि नंतर काढले तर, मुळात सक्ती कशासाठी, हे पटले पाहिजे. दंडाची रक्कमही ज्यांना किरकोळ वाटते, त्यांचा बंदोबस्त कसा करणार. कोणत्याही घोषणेची अंमलबजावणी काही काळाने थंडावते तसेच याचेही होईल, असे अनेक धोके दाखवून देताना अंमलबजावणीची यंत्रणाच तोकडी असल्यावरही त्यांनी बोट ठेवले आहे. हेल्मेट नसले तर वाहतूक पोलीस दंड करतात. पण, म्हणून एकदा दंड भरलेला नंतर कायम हेल्मेट वापरतोच, असे नाही. या कारवाईकडे अनेक बाइकस्वार गांभीर्याने पाहत नाहीत. सध्या १०० रुपये दंड आकारला जातो, पण त्या १०० रुपयांचे अनेकांना विशेषत: कॉलेज तरुणांना फार काही वाटत नाही. त्यामुळे हेल्मेट घातले नाही, तर पेट्रोल मिळणार नाही, ही घोषणा योग्य आहे. यात शिक्षाही होईल आणि दंडाच्या स्वरूपात बसणारा फटकाही नसेल. - अभिजित बारसे, एसवायबीए, जोशी-बेडेकर महाविद्यालय>परिवहनमंत्र्यांची घोषणा अयोग्य आहे. केवळ पेट्रोल मिळावे म्हणून हेल्मेट वापरा, ही संकल्पनाच पटत नाही. एखादा जर पेट्रोलपंपाच्या शेजारी राहत असेल तर पेट्रोल मिळणार नाही म्हणून त्याने दोन मिनिटांच्या अंतरासाठी हेल्मेट वापरायचे का? दोन-तीन मिनिटांच्या अंतरासाठी हेल्मेट वापरावे का? जिथे खूप अपघात होतात, वाहन जलदगतीने चालवले जाते, अशा रस्त्यांवर हेल्मेट वापरले पाहिजे. परंतु, जवळच्या अंतरासाठी प्रत्येक वेळी हेल्मेट वापरणे गरजेचे नाही. - प्रसाद दलाल, बीई, दत्ता मेघे महाविद्यालय>विनाहेल्मेट बाइक चालवणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी परिवहनमंत्र्यांनी केलेली घोषणा चांगली आहे. त्यातून अपघातांना आळा बसेल. त्यातील जीव वाचू शकेल. परंतु, प्रत्येक जण हा नियम किती पाळेल, याबाबत शंका आहे. आपल्याकडे एखादा निर्णय घेतला किंवा कायदा केला, तर त्याचे फार काळ पालन केले जात नाही. त्यामुळे ‘नो हेल्मेट नो फ्युएल’ ही घोषणा वाहनचालक किती गांभीर्याने घेतील, याबाबत शंकाच आहे. - अश्विनी सावंत, एसवायबीए, जोशी-बेडेकर महाविद्यालय>परिवहनमंत्र्यांनी घेतलेला निर्णय योग्यच आहे. आजकालची वाहतूक पाहता आपण जरी सुरक्षितपणे वाहन चालवले तरी आपल्या आजूबाजूचा वाहनचालक हा सुरक्षितपणे वाहन चालवेल, याबाबत विश्वास उरलेला नाही. हेल्मेट केवळ स्वत:च्या नव्हे, तर दुसऱ्याच्या सुरक्षिततेसाठी घातलेच पाहिजे, यात शंकाच नाही. लोकांना साधेपणाने सांगून पटत नाही. त्यामुळे या घोषणेत हे केले नाही तर ते मिळणार नाही, हा जो निर्णय घेतला आहे, तो योग्यच आहे. निदान पेट्रोलसाठी का होईना, हा नियम पाळला जाईल. या निर्णयामुळे पेट्रोलही मिळेल आणि सुरक्षिततेचा हेतूदेखील साध्य होईल. - सानिका कट्टी, एमए इन संस्कृत, मुंबई विद्यापीठ
पेट्रोलपुरती हेल्मेटसक्ती काय कामाची?
By admin | Published: July 22, 2016 2:31 AM