अजितदादांचं काय चुकलंय ?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 12:53 PM2019-09-30T12:53:35+5:302019-09-30T13:01:50+5:30

नियोजनबद्ध पद्धतीने आपण स्वच्छ असल्याचे सप्रमाण पुरावे लोकांच्या मनापर्यंत पोहचविणे आणि आरोप करणाऱ्यांवर अब्रुनुकसानीचे खटले दाखल करणे, हाच राजमार्ग ! हाच मार्ग अजितदादांचा भविष्यातील राजकीय प्रवास सुखावह बनवू शकतो, हे कोण नाकारणार ?

What is wrong with Ajit Dada ? | अजितदादांचं काय चुकलंय ?

अजितदादांचं काय चुकलंय ?

Next

विश्लेषण : राजा माने

अजितदादा अश्रू रोखू शकले नाहीत...दादांच्या अश्रूंनी त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाचं मन हेलावले...राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांना तर अक्षरशः भरुन आलं ! उभा महाराष्ट्र धीरगंभीर झाला...आणि मग...दादांच्या बाबतीत असं का घडतंय ? हा प्रश्न राज्यातील सर्वसामान्य माणसाला कमालीचा त्रास देवू लागला...अनेकजण राजकारणाच्यापलीकडे जावून प्रश्नाकडे पाहू लागले. आत एक आणि बाहेर दुसरेच दाखविणारी प्रवृत्ती सहन न करणारे, शिस्तीचे व कोणत्याही कामातील सर्वोत्कृष्ठतेचे भोक्ते, कोणत्याही कामातील अचूकता आणि नीटनेटकेपणाविषयी सदैव आग्रही असणारे, स्पष्टवक्ते, प्रसंगी फटकळ बनणारे "रोखठोक दादा" नेहमीच अनेकांच्या प्रेमाचा आणि कौतुकाचा विषय राहिले आहेत. कणखर, धाडसी आणि बिनधास्त या गुणांची संपदा लाभलेले दादा अचानक अस्वस्थ, बेचैन होतात व त्यांच्या स्वभावास अनुसरुन आमदारकीचा राजीनामा देतात. आणि काही काळासाठी अज्ञातवासात निघून जातात...पुन्हा तुमच्या-आमच्या मनात तोच प्रश्न गोंधळ घालू लागतो..दादांच्या बाबतीत असं का घडलं,का घडतं ?

जी चूक काकांची तीच दादांची...
त्याच प्रश्नाचं उत्तर शोधताना इतिहासातील संदर्भांच्या उतरांड्या उतरविणे अपरिहार्य ठरते. नवमहाराष्ट्राच्या निर्मिती नंतर पहिलं दशक सोडलं तर १९७०च्या दशकापासून आजपर्यंत महाराष्ट्राच्या जडणघडणीत, समाजकारण-राजकारणात शरद पवार हे नाव सदैव अग्रभागी राहिले. शरद पवारांच्या राजकीय भूमिकांबद्दल अनेकांची वेगवेगळी मते आहेत पण त्यांच्या अष्टपैलू, प्रगल्भ, पुरोगामी आणि लोकाभिमुख विधायक दृष्टिकोनाबद्दल कुणाचेही दुमत असू शकत नाही. किंबहुना देशातील सर्वच राजकीय पक्षांचे नेते शरद पवारांचा आदर करीत आले आहेत. पण १९९०च्या दशकात ते अनेक आरोपांसाठी टारगेट केले गेले. भाजपचे नेते गोपीनाथराव मुंढे यांनी भ्रष्टाचारापासून दाऊद संबंधापर्यंतचे अनेक आरोप करीत त्यावेळी राज्यभर यात्रा काढली. महाराष्ट्र ढवळून काढला. खैरनार सारखे अधिकारी तर पवारांच्या विरोधात ट्रकभर पुरावे देण्याची भाषा करीत राहिले. आरोपांची राळ उठविली गेली. त्या आरोपांमुळे पवारांविषयी जनमानस कलुषित झालं. परिणामी १९९५ साली भाजप-शिवसेनेने महाराष्ट्राच्या विधानभवनावर भगवा फडकविला! पवारांच्या विरोधातील आरोपांनी कलुषित झालेले महाराष्ट्राचे मानस बदलण्याचा, आरोपांचे वेळोवेळी खंडन करुन सर्वसामान्य माणसाचे मन स्वच्छ करण्याचा शिस्तबद्ध आणि ठोस प्रयत्न स्वतः पवारांनी, त्यांच्या निष्ठवंत नेत्यांच्या फळीने अथवा काँग्रेस पक्षानेही कधी केलाच नाही. त्या आरोपांमुळे शरद पवार लोकप्रियतेच्या शिखरावर राहूनही, त्यांच्या बद्दल आदर असूनही सर्वसामान्य माणसाच्या मनात पवारांविषयी सदैव संभ्रम व संशयाचेच वातावरण राहिले. पुढे ते आरोप हास्यास्पद होते हे सिद्ध झाले, हे महाराष्ट्र जाणतो. पण "कर नाही तर डर कशाला?" या म्हणीला घट्ट मिठी मारण्याची व आरोपांना गांभीर्याने न घेता दुर्लक्ष करण्याची किंमत मात्र शरद पवारांना मोजावी लागली. महाराष्ट्राची अचूक नस पकडणाऱ्या पवारांनी त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांबाबतीत महाराष्ट्राला गृहित धरण्याची चूक केली. नेमकी तीच चूक अजितदादा गेल्या १०-१५ वर्षांपासून करीत आहेत. राज्याचे कारभारी तुम्ही होता, मग घडणाऱ्या प्रत्येक चांगल्या-वाईट गोष्टीची जबाबदारी ही आपोआपच कारभाऱ्यावर येते. त्यातून समाज काही मते बनवीत असेल तर ते चूक की बरोबर, ही जबाबदारी कोणाची ? आरोपांकडे दुर्लक्ष करणे, नेहमीच योग्य नसते. त्या चुकीची जाणीव त्यांना का होवू नये ?

हत्ती आणि सुईचे छिद्र...
अजितदादांचा राजकारणातील प्रवेश हा शरद पवार परिवाराच्या एकहाती सत्तेच्या काळात झाला. आज अस्तित्वात आलेला सहकार कायदा त्यावेळी नव्हता."सहकारात सुईच्या छिद्रातून हत्तीही जातो",असे सहकार क्षेत्रातील अनेक दिगग्ज गमतीने व कौतुकाने सांगायचे, असा तो काळ! कायद्याने जनहिताचे काम होत नसेल तर ते कामच कायद्यात बसविण्याला लोकमान्यता असायची! त्याच कारणाने कुणाच्याही बाबतीत  आरोप करायला वाव मिळतो. विरोधक म्हणून त्याचा फायदा का घेवू नये ? सिंचन घोटाळ्याच्या आरोपापासून अजितदादांच्या बाबतीत तेच घडत आले आहे. आज अजितदादा पाटबंधारे खात्याचे बजेट तरी सत्तर हजार कोटी रुपयांचे होते का ? शिखर बँकेत ठेवी ११-१२ हजार कोटींच्या असताना  घोटाळा २५ हजार कोटींचा कसा होवू शकतो का ? असे सवाल करताहेत. सिंचन असो वा शिखर बँक घोटाळा, होणाऱ्या आरोपांची गांभीर्याने दखल घेवून जे जे मुद्दे ते आज सांगताहेत ते त्या त्यावेळी लोकांसमोर आणले असते तर आजची वेळ आली असती का ? वर्षांनुवर्षे हजारो कोटींचे आरोप होत राहतात स्वतः अजितदादा, राष्ट्रवादी पक्ष अथवा त्यांचे तथाकथित समर्थक पेटून उठून आरोप खोडून काढताहेत किंवा आरोप करणाऱ्यांच्या विरोधात त्यांनी अब्रु नुकसानीचे खटले दाखल करण्याची मोहीम हाती घेतली आहे, असे चित्र महाराष्ट्राला कधीही पहायला मिळाले नाही. या उलट दादा आणि मंडळी सत्ताकारणात मश्गुल राहिल्याचे महाराष्ट्राने पाहिले. आरोप सिद्ध झाला तरच आरोपी गुन्हेगार ठरतो ! आरोप सिद्धतेच्या प्रक्रियेपर्यंत आरोप समाज मन कलुषित करुन संशयाचे वातावरण निर्माण करतात, हे वास्तव २०१४ च्या सत्ता परिवर्तनानंतर तरी अजितदादा आणि त्यांच्या समर्थकांनी जाणायला हवे होते. नेमके तसे घडले नाही आणि अजितदादांवर आजचा बाका प्रसंग ओढवला ! अजूनही बाजी पूर्णपणे हातातून गेलेली नाही. नियोजनबद्ध पद्धतीने आपण स्वच्छ असल्याचे सप्रमाण पुरावे लोकांच्या मनापर्यंत पोहचविणे आणि आरोप करणाऱ्यांवर अब्रुनुकसानीचे खटले दाखल करणे, हाच राजमार्ग ! हाच मार्ग अजितदादांचा भविष्यातील राजकीय प्रवास सुखावह बनवू शकतो, हे कोण नाकारणार ?
(लेखक लोकमतचे राजकीय संपादक आहेत)

 

Web Title: What is wrong with Ajit Dada ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.