सरकारकडून अत्यंत गलिच्छ कारभार सुरु आहे. आज आठ लक्षवेधी होत्या. सात लक्षवेधी मंत्री सभागृहात नसल्याने पुढे ढकलल्या. यांना विधीमंडळातील कामात लक्ष नाहीय. यांचे वेगळ्यात कामांत लक्ष गुंतलेय, अशी टीका अजित पवारांनी केली. यावर फडणवीस यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
विधानसभेत आज मोठा गोंधळ उडाला आहे. लक्षवेधीला मंत्रीच आले नसल्याने ती उद्यावर ढकलण्यात आल्याने कालिदास कोळंबकर, विरोधी पक्षनेते अजित पवार संतापले आहेत. मंत्र्यांच्या अनुपस्थितीवर तालिकाध्यक्ष संजय शिरसाट यांची तीव्र नाराजी व्यक्त केली.
मंगळवारी रात्री १ वाजेपर्यंत अधिवेशन चालले होते. यामुळे सर्वच पक्षाच्या आमदार, मंत्र्यांना जाण्यासाठी उशीर झाला. लक्षवेधी सकाळी लवकर असल्याने विरोधी पक्षाचे तसेच सत्ताधारी पक्षाचे आमदार सभागृहात दाखल झाले होते. परंतू, शिंदे सरकारच्या मंत्र्यांनीच दांडी मारल्याने लक्षवेधी पुढे ढकलण्याची वेळ सरकारवर आली.
आज सभागृहात जो प्रकार घडला त्यावर मी दिलगिरी व्यक्त करतो. काल रात्री १ वाजेपर्यंत कामकाज चालले. परंतू काल ऑर्डर ऑफ द डे रात्री १ वाजता निघाली. ती रात्री ९ वाजता निघते. यानंतर मंत्र्यांना ब्रिफिंग घ्यावे लागते. परंतू, ते शक्य झाले नाही, असे फडणवीस म्हणाले. सर्व मंत्र्यांना सांगण्यात येईल की सर्व मंत्र्यांनी अपवादात्मक स्थिती वगळता सभागृहात हजर राहिलेच पाहिजे.
यावर विधानसभा अध्यक्षांनी ऑर्डर ऑफ द डे वेळेत मिळेल याची खबरदारी घेतली जाईल. आज कामकाज संपण्यापूर्वी विरोधीपक्षनेते, उपमुख्यमंत्री आदींची बैठक घेऊन लक्षवेधीसाठी दिवस, वेळ ठरवेन असे सांगितले.