राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यापासून सुप्रिया सुळे ह्या सातत्याने देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेत आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात पेटलेले मराठा आरक्षण आंदोलन आणि त्यानंतर बीडसह काही ठिकाणी भडकलेल्या हिंसाचारानंतर सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गृहमंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची मागणी केली होती. त्यावरून आता भाजपाने सुप्रिया सुळेंवर जोरदार टीका केली आहे. काहीही घडले, की देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा मागायचा, हा उद्योग आता बंद करा आणि आपला उरलासुरला पक्ष कसा टिकेल, ते पाहा, असा सल्ला भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सुप्रिया सुळे यांना दिला आहे.
या मुद्द्यावरून सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधताना केशव उपाध्ये म्हणाले की, सुप्रिया सुळेजी तुम्हाला सध्या जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी देवेंद्र फडणवीसच दिसत आहेत. काय करणार सध्या तुम्हालाही दुसरा उद्योग नाही. ज्या देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण दिले. उच्च न्यायालयात कायम राहिले. पण, तुमच्या महाआघाडीच्या आणि त्या सरकारचे पालक शरद पवार यांच्या नाकर्तेपणामुळे ते पुढे टिकले नाही. तो विषय आता जुना झाला. काहीही घडले, की देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागायचा, हा उद्योग आता बंद करा आणि आपला उरला सुरला पक्ष कसा टिकेल, ते पाहा. आजच तुमच्या पक्षाचा एक आमदार फुटून दुसऱ्या गटात गेला म्हणे, असा टोलाही केशव उपाध्ये यांनी लगावला.
दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पुन्हा एकदा राज्य सरकारवर टीका केली त्या म्हणाल्या की, मनोज जरांगे पाटील यांना सरकारने दगाफटका केला आहे. मराठा, लिंगायत, धनगर समाजाला त्यांनी दगा दिला आहे. याला पूर्ण जबाबदार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. आता त्यांनी एकनाथ शिंदेंनाही दगाफटका केला आहे, एका वकीलाचे स्पष्टीकरण आले आहे.ते म्हणाले, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला तर आम्ही त्यांना एमएलसी करु, म्हणजे यांना ते अपात्र होणार आहेत हे माहित होतं. म्हणजे अगोदर उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडला, आता ते त्यांचा घटक पक्षालाही दगा देत आहे. यामुळे माझी अजित पवार गटाला एक विनंती आहे, आपण कधीतर एका ताटात जेवलो आहे, ते आता शिंदेंनाही धोका देत आहे. त्यामुळे सांभाळून राहा, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.