"निकाल काहीही लागला असला, तरी...", प्रकाश आंबेडकरांचे उद्धव ठाकरेंना आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 10:59 PM2024-01-10T22:59:52+5:302024-01-10T23:01:36+5:30
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालावर प्रकाश आंबेडकर यांनी 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर अंतिम निकाल जाहीर केला. यावेळी शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटाच्या आमदारांना राहुल नार्वेकर यांनी पात्र ठरवले. मात्र एकनाथ शिंदे यांचा गटच मुख्य शिवसेना असल्याचे निरीक्षण राहुल नार्वेकर यांनी नोंदवले आहे. दरम्यान, राहुल नार्वेकरांनी निकाल दिल्यानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. याबाबात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल काहीही लागला असला, तरी या प्रवृत्तीविषयी आपण मिळून लढू, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरेंना केले आहे.
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालावर प्रकाश आंबेडकर यांनी 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये प्रकाश आंबेडकर म्हणाले, "राहुल नार्वेकरांनी जो निकाल दिला, त्याच्यामुळे युतीमधील आमचे मित्रपक्ष उद्धव ठाकरे यांना धक्का बसला आहे. अपेक्षा होती की, खरा निकाल लागेल मात्र, खरा निकाल लागला नाही. उद्धव ठाकरे यांच्याप्रती आम्ही सहानुभूती व्यक्त करतो. ज्या दिवशी निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला अधिकृत नाव आणि चिन्ह कायम ठेवण्याची परवानगी दिली, त्याच दिवशी शिवसेना( UBT) यांची हार झाली होती. आज फक्त औपचारिकता बाकी होती. आम्हाला उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
We are sympathetic to our alliance partner Shiv Sena - Uddhav Thackeray for the cause of action.
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) January 10, 2024
SS (UBT) failed to build a strong case in front of the Election Commission of India and the Supreme Court.
SS (UBT) had lost the fight on the very day when ECI allowed Eknath… pic.twitter.com/KR2LUV6T3I
सर्वोच्च न्यायालयाचे नियम धाब्यावर बसवले, ठाकरेंची टीका
आजच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी राहुल नार्वेकरांवर सडकून टीका केली. ते म्हणाले की, नार्वेकरांना त्या ठिकाणी कशासाठी बसवण्यात आलं ते आता समोर आलं आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निकाल हे सर्वोच्च असतात, एक परिमान असते. पण नार्वेकरांनी सर्वोच्च न्यायालयाचे नियम धाब्यावर बसवले. त्यांच्या मागे महाशक्ती असल्यामुळे ते सर्वोच्च न्यायालयाच्या वर असल्याचे दाखवून दिले. शिवसेना कुणाची याचा निर्णय निवडणूक आयोगाचा निर्णय चुकीचा आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालयात लढाई सुरू आहे. पण नार्वेकरांनी सर्वोच्च न्यायालयाचा अपमान केला.