नम्रता भोसले -खटाव -व्हॉट्स अॅपसारख्या सोशल मिडियातून केवळ चुकीचे संदेश दिले जातात, असे नाही तर या गरजूंना मोलाची मदत करता येऊ शकते, हे तरुणाईने दाखवून दिले आहे. मोबाईलवरुन फक्त कॉल करा आम्ही तुम्हाला रक्तदान करतो, अशी साद घालत व्हॉट्स अॅपवरून रक्ताचं नातं जुळलं जाऊ लागलंय. सोशल मिडियाचा सकारात्मक उपयोग अशाही पध्दतीने होऊ शकतो, हे या तरुणाईनं दाखवून दिलंय. ‘वुई आर हेल्पिंग बडीज्’ या ग्रुपच्या माध्यमातून सातारा, सांगली जिल्ह्यातील तरुणांनी रक्तदानाचे कार्य हाती घेतले आहे. सध्या ब्लड बँकेत रक्तटंचाई दिसून येऊ लागली आहे. रक्तदान हेच श्रेष्ठदान हे घोषवाक्य फक्त वाचून नजरेआड केले जात आहे. त्यातच विशिष्ट गटाचे रक्त वेळेत न मिळाल्यामुळे बऱ्याच वेळा रुग्णांना जीवही गमवावा लागल्याचेही दिसते. ब्लड बँकेची माहिती, ब्लड ग्रुप माहीत नसणे, जुळणारा रक्त गट असणारे रक्तदाते शोधणे आदी सोपस्कर होईपर्यंत एखाद्याला प्राणही गमवावे लागल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. परंतु सोशल मिडिया तसेच जाहिरातींमधून वारंवार केले जाणारे प्रबोधन केले जात आहे. काही रक्तदात्या तरुणानी स्वत:चे नाव, मोबाईल क्रमांक, तसेच रक्तगटाची माहिती, ई-मेल अॅडे्रस पाठवून सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहन करण्यास सुरुवात केली आहे. संबंधित माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठविण्याची विनंतीही केली जाते. त्यामुळे व्हॉट्स अॅपवर रक्तदात्यांचा स्वतंत्र गट तयार होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. ही गोष्ट सध्या जरी लहान व किरकोळ वाटत असली तरी सोशल मिडियाच्या माध्यमातून हा संदेश आपोआपच इतरांपर्यंत पोहोचत असल्यामुळे कुठेही अडचण येत नाही. घरबसल्या प्रत्येकाला या रक्तदात्यांचे संपर्क नंबर, तसेच ब्लड ग्रुपची माहिती मिळू लागल्यामुळे अशा रक्तदात्याच्या ग्रुपला अनेक रक्तदाते जॉईन होऊ लागले आहेत. रक्तदात्या तरुणांची ही सोशल चळवळ सर्वांच्या दृष्टीने कौतुकास्पद आहे. सध्या रक्तातील प्लेटलेटचे प्रमाण कमी होण्याचे प्रमाण अधिक वाढलेले पाहावयास मिळत आहे. अशा रुग्णाला रक्ताची गरज अधिक असते. त्यातच रक्ताच्या टंचाईमुळे अनेक वेळा रुग्णाला जीव गमवावा लागल्याच्याही घटना घडल्या आहेत. या सर्व बाबी गंभीर आहेत. परंतु अशा वेळी तरुणाई स्वयंस्फूर्तीने पुढे येत असल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात या लोकांचे अतिशय मोलाचे सहकार्य लाभत असल्यामुळे अशा रक्तदात्या तरुणाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. - डॉ. युनुस शेख, तालुका वैदकीय अधिकारी
‘व्हाट्स अॅप’वरून जुळतायत ‘रक्ता’ची नाती!
By admin | Published: December 02, 2014 10:12 PM