महेश सरनाईक सिंधुदुर्ग : कोकण रेल्वे मार्गावर वैभववाडी ते नांदगाव दरम्यान कोकण रेल्वेचा माल वाहतूक करणाऱ्या बीआरएन या गाडीचे एक चाक रूळावरून घसरल्याने मार्गावरील वाहतूक तीन तास ठप्प झाली होती. पहाटे ४.४५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. संबंधित रेल्वे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी सकाळी ७.१0 मिनिटांनी पुन्हा चाक बदलून ती गाडी मार्गस्थ केल्यानंतर सकाळी ७.३0 वाजण्याच्या सुमारास रत्नागिरीहून मडगावकडे जाणारी पॅसेंजर गाडी पहिल्यांदा मार्गस्थ झाली. त्यानंतर सर्व वाहतूक पुर्ववत झाली.कोकण रेल्वे मार्गावर वैभववाडी आणि नांदगावच्या दरम्यान, शनिवारी सकाळी माल वाहतूक करणाऱ्या बीआरएन रेल्वेचे एक चाक रूळावरून घसरले. त्यामुळे संपूर्ण कोकण रेल्वे मार्ग बंद झाला. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाºया अनेक गाड्या वेगवेगळ्या ठिकाणच्या स्थानकांमध्ये थांबवून ठेवण्यात आल्या होत्या.पहाटे ४.४५ च्या दरम्यान ही घटना घडली. घटना घडल्यानंतर कोकण रेल्वेच्या संबंधित यंत्रणेने आवश्यक ती काळजी घेत रूळावरून घसरलेले चाक अथक प्रयत्न करून सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास काम पूर्ण करून पुन्हा चाक बसविले आणि ती गाडी मार्गस्थ केली.यानंतर सकाळी ४.४५ पासून बंद असलेली कोकण रेल्वे ७.३५ वाजता पूर्वव्रत झाली. यावेळी रत्नागिरीकडून मडगावकडे जाणारी पॅसेंजर गाडी पहिल्यांदा या मार्गावरून धावली. त्यानंतर या मार्गावर तीन तास विविध स्थानकांमध्ये थांबवून ठेवण्यात आलेल्या गाड्या हळू-हळू मार्गस्थ करण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला.उत्तर आणि दक्षिण भारत जोडणारा महत्वाचा दूवाकोकण रेल्वे मार्गावर दक्षिणेकडील गोवा, कर्नाटक, केरळ, कन्याकुमारी, तामिळनाडू या राज्यातून मोठ्या प्रमाणावर प्रवासी व मालवाहतूक होते. दरदिवशी लाखो प्रवाशी प्रवास करतात. तसेच उत्तर भारतात गुजरात, राजस्थान, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, पंजाब ते दिल्ली पासून अगदी जम्मू-काश्मिरपर्यंत दक्षिण भारताला जोडणारा कोकण रेल्वे हा महत्वाचा दुवा आहे.
त्यामुळे कोकणातून मुंबईकडे धावणाऱ्या काही मोजक्या गाड्या वगळता उत्तर आणि दक्षिण भाग जोडणारा हा मार्ग भारतीय रेल्वेमध्ये महत्वाचा मार्ग समजला जातो. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावर दुर्घटना घडली की भारताचे दोन भाग जोडणारी यंत्रणाच विस्कळीत होते. यावर्षी पावसाळ्यात तशी एकही दुर्घटना झाली नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासनाचे कौतुक होत आहे.पावसाळ्यातील पहिलाच खोळंबाकोकण रेल्वे मार्ग हा दऱ्या, खोऱ्यातून आणि मोठ-मोठ्या भोगद्यांमधून काढलेला आहे. या मार्गावर लहान-मोठे पूल आणि भोगदे यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे कोकणात पावसाळ्यात पडणाऱ्या संततधार पावसाने दरड कोसळून कोकण रेल्वे ठप्प होण्याच्या घटना यापूर्वी वारंवार होत होत्या. मात्र, यावर्षी एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडूनही या मार्गावर कोठेही दरड किवा माती कोसळण्याची एकही घटना घडली नाही.
कारण धोकादायक ठिकाणांबाबतची आवश्यक काळजी यावेळी कोकण रेल्वेने घेतल्यामुळे आतापर्यंत झालेल्या पावसाळ्यात एकदाही कोकण रेल्वे ठप्प झाली नव्हती. माल वाहतूक करणाऱ्या बीआरएन या गाडीचे चाक रूळावरून घसरल्याने पहिल्यांदाच वाहतुकीत खोळंबा झाला.गणेशोत्सव तोंडावर, रेल्वेमार्ग सुरळीत ठेवण्याची गरजकोकणातील सर्वात मोठा आणि घरोघरी साजरा होणारा गणेशोत्सव अगदी तोंडावर आला आहे. कोकण रेल्वेने लाखो चाकरमानी गणेशोत्सवासाठी घरोघरी येणार आहे. पश्चिम रेल्वेने यासाठी मोठ्या प्रमाणावर जादा गाड्यांची सोयदेखील केली आहे. त्यामुळे आगामी महिनाभर कोकण रेल्वे मार्गावर गाड्यांची वर्दळ वाढणार आहे. त्यामुळे पूर्ण सप्टेंबर महिना रेल्वेमार्ग सुरळीत ठेवण्याची मोठी जबाबदारी यानिमित्ताने प्रशासनावर आहे.