Maharashtra News: शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार संपर्कात असल्याचा दावा केला. त्यानंतर उदय सामंत यांनीही अशाच आशयाचे विधान केले. दोन्ही नेत्यांच्या विधानांनी राज्यात पुन्हा राजकीय भूकंपाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
'तुम्ही म्हणालात की डॉक्टर नसलो तरी ऑपरेशन करतो. येणाऱ्या काळात काही ऑपरेशन करण्याचा मानस आहे का? कारण उदय सामंत म्हणाले की, उबाठा आणि काँग्रेस पुन्हा एकदा फुटणार आहे. त्यांचे प्रवेश तुमच्याकडे होत आहे. काही जण तुम्हाला भेटून गेले?', असा प्रश्न एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला होता.
तुम्हाला कल्पना देऊ -एकनाथ शिंदे
यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "तुम्ही त्याचा अर्थ फक्त राजकीय का काढता? राजकीय ऑपरेशनसाठी जेव्हा रुग्ण मिळेल, तेव्हा तुम्हाला सांगू. तुम्हाला कल्पना देऊ", असे सांगत त्यांनी स्मितहास्य केले.
लाडकी बहीण योजना ही संकल्पना माझी होती - एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून पुन्हा श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. याबद्दल उपमुख्यमंत्री शिंदेंना प्रश्न विचारण्यात आला. एकनाथ शिंदे म्हणाले, 'अरे मुख्यमंत्री मी होतो. संकल्पना मांडल्यानंतर आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री, आम्ही बसून ताबडतोब योजना अंमलात आणली. सर्वांनी मिळून आम्ही मान्यता दिली. एक टीम वर्क म्हणून आम्ही काम केलं आहे.
"ही श्रेयवादाची गोष्ट बिलकूल नाहीये. हे काय श्रेय घेण्याचं काम? लोकांचे जीवनामध्ये आपण काय बदल घडवू शकतो. मला काय मिळालं, यापेक्षा मी महाराष्ट्रातील जनतेला काय देणार, ही भावना ठेवून आम्ही अडीच वर्ष काम केलं. पुढची पाच वर्षही आम्ही असंच काम करू", असे एकनाथ शिंदे लाडकी बहीण योजनेबद्दल बोलले.