- मनीषा म्हात्रे, मुंबईमुलुंडचे काळे दाम्पत्य दरवर्षी होळीपूर्वी अक्कलकोटला स्वत:च्या गाडीने जात असत. यंदा जास्त माणसे असल्याने त्यांनी ट्रॅव्हल्स कंपनीकडून टेम्पो ट्रॅव्हलर गाडी बूक केली. त्यांच्याआधी ही गाडी एका गुजराती कुटुंबाने बुक केली होती. मात्र पैशांचा वाद झाल्यामुळे त्यांनी ती टेम्पो टॅ्रव्हलर रद्द केल्याने ती काळे यांना उपलब्ध झाली. जर तो पैशांचा वाद टळला असता तर हा अपघात घडला नसता, असे त्यांच्या शेजाऱ्यांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुलीने केलेला हट्ट चव्हाण कुटुंबीयांच्या जिवावर बेतल्याने मुलुंड परिसरात शोककळा पसरली आहे. मूळचे सांगलीचे रहिवासी असलेले चव्हाण कुटुंबीय. व्यावसायिक असलेले जयवंत एन. चव्हाण (४५) हे पत्नी योगिता (४०), मुलगी रेवती (१४) आणि मुलगा हेरंब (२०) यांच्यासोबत मुलुंड पूर्वेकडील सज्जनवाडीच्या यशोप्रसाद इमारतीत राहायचे. त्यांचे वाशी मार्केटमध्ये घाऊक विक्रीचे दुकान आहे. मुलगा अभिषेक हा इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असल्याने तो कोल्हापूरला राहतो. येथील नीता इमारतीमध्ये राहत असलेले विजय काळे आणि पत्नी ज्योती या दाम्पत्यासोबत त्यांचा घरोबा होता. काळे रेवतीला मुलीसारखे मानत. काळे दाम्पत्य दरवर्षी होळीपूर्वी अक्कलकोट येथे देवदर्शनाला जात असे. त्यांच्यासोबत रेवतीही यापूर्वीही दोन ते तीन वेळा जाऊन आली. मात्र यंदा तिने आई-बाबांनाही येण्यास हट्ट केला. त्यांनीही सुटी म्हणून मुलीचा हट्ट मान्य केला. त्यांनी देवदर्शनाला होकार दिला. पहिल्यांदाच त्यांच्यासोबत निघाले. हे सर्व मुलुंडहून रात्री ९ वाजता निघाले. पुढे जुन्नरचे रहिवासी असलेल्या दोन नातेवाइकांना चाकण येथून घेऊन ते अक्कलकोटला जाणार होते. तेथून पुढे नरसोबावाडी करत कोल्हापूर फिरून १३ तारखेला मुंबईत येणार होते, अशी माहिती ज्योती टुर्स अॅण्ड ट्रॅव्हलचे हिरनगौडा यश शिरोळ उर्फ पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. मुलुंडमध्ये जयवंत चव्हाण यांचे ५० ते ६० नातेवाईक आहेत. सणा-समारंभाला ते एकत्र जमतात. यंदा त्यांच्या वडिलांचे भाऊ म्हणजे जयवंत यांच्या काकांचा साठावा वाढदिवस होता. तो वाढदिवस धूमधडाक्यात साजरा करण्याचे जयवंत यांनी ठरवले. त्यासाठी मे महिन्यात सगळे गावी एकत्र येणार होते. मात्र त्यापूर्वीच झालेल्या दुर्दैवी घटनेमुळे सारे कुटुंबच हादरल्याचे जयवंत यांच्या काकी विमल यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.दत्तक मुलगाही गेला...विजय काळे यांना मूल नसल्याने त्यांनी त्यांच्या दुकानात काम करत असलेल्या योगेश लोखंडे याला दत्तक घेतले होते. तेच त्याचा सर्व खर्च उचलत होते. तो मुलुंड पूर्वेच्या नवघर गल्लीमध्ये आई-बाबा, एक बहीण यांच्यासोबत राहत होता. आई-बाबांना जातो असे सांगून शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास त्याने घर सोडले. मात्र हे जाणे कायमचे असेल असे स्वप्नातसुद्धा वाटले नव्हते, असे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले.
अपघात टळला असता
By admin | Published: March 12, 2017 1:34 AM