नागपूर : राज्यात संत्र्याला भाव नाही. अगदी कवडीमोलाने शेतकऱ्यांना संत्री विकावी लागत आहेत. ‘ग्रेड-१’च्या संत्र्यांना प्रति किलो ७ ते १० रुपये भाव मिळतो, परंतु विधिमंडळ परिसरात आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी हीच संत्री ३५ रुपये किलो या दराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विकत घ्यायला लावली. मुख्यमंत्र्यांनीदेखील तीन किलो संत्र्यांसाठी शंभराची नोट काढून दिली व संत्र्यांचा आस्वाद घेतला. संत्रा उत्पादकांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाने संत्रापिकासाठी धोरण जाहीर करावे यासह इतर मागण्यांसाठी भाजपचे आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवरच संत्री आणून त्यांचे ‘मार्केटिंग’ केले. यावेळी अनेक आमदार त्यांच्याकडे आले. विधिमंडळाचे कामकाज आटोपल्यानंतर मुख्यमंत्रीदेखील तिथे आले आणि त्यांनी याबाबत विचारणा केली. ‘संडे हो या मंडे...’ याच धर्तीवर ‘आरोग्याचा महामंत्र, रोज खा संत्र’ ही ‘स्लोगन’ शासनाने लोकप्रिय करावी. मोर्शी-वरुड हा पट्टा संत्रा बागायतीसाठी प्रसिद्ध आहे. मात्र, जेथे उत्पादन होते, तेथेच या फळावर प्रक्रिया करणारे ‘प्रोसेसिंग युनिट्स’ नाहीत, शिवाय संत्र्याचे योग्य ‘मार्केटिंग’देखील होत नाही. या बाबींसंदर्भात शासनाकडून पुढाकाराची अपेक्षा आहे असे डॉ. बोंडे यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी यावर सकारात्मक पावले उचलू, असे आश्वासन देत, संत्री विकत घेतली. डॉ. बोंडे यांनी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनादेखील याचप्रकारे संत्री विकली. मुख्यमंत्री व मंत्र्यांनी ज्या भावात संत्री विकत घेतली, तोच दर संत्रा उत्पादकांनादेखील मिळणार का? अशी चर्चा परिसरात रंगली होती. (प्रतिनिधी)
मुख्यमंत्री संत्री विकत घेतात तेव्हा...
By admin | Published: December 08, 2015 1:38 AM