मुंबई - मागील काही वर्षांपासून राज्यात पडलेला दुष्काळ आणि यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांना आता नव्या सरकारकडून संपूर्ण कर्जमाफीची प्रतीक्षा लागली आहे. कर्जमाफी करण्याचे आश्वासन शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून देण्यात आले होते. मात्र त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे शेतकरी नव्या सरकारच्या कर्जमाफीच्या घोषणेकडे डोळे लावून बसले आहेत.
राज्याची आर्थिक स्थिती आणि शेतकरी कर्जमाफीचा आढावा घेतल्यानंतरच कर्जमाफीची घोषणा होईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वतीने सांगण्यात आले आहे. मात्र त्यावर अद्याप निर्णय झाला नाही. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे विधीमंडळात कर्जमाफीची घोषणा होईल अशी आशा शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे अधिवेशनाकडे शेतकरी वर्ग लक्ष ठेवून आहे. दरम्यान विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला उद्धव ठाकरे यांना कर्जमाफीच्या आश्वासनाची आठवण करून दिली आहे.
भाजपच्या काळात शेतकरी कर्जमाफी करण्यात आली होती. मात्र निकष आणि अटींमुळे अनेक शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित होते. तसेच फडणवीस यांच्याकडून कर्जमाफीच्या घोषणेसाठी मोठा कालावधी लागला होता. त्यावेळी त्यांनी कर्जमाफीसंदर्भात अभ्यास सुरू असल्याचे म्हटले होते. आता ठाकरे सरकारही अद्याप अभ्यासच करतय का, असा प्रश्नही शेतकरी उपस्थित करत आहेत.