मुंबई : दहीहंडीत उच्च न्यायालयाच्या नियमांचे पालन होते की नाही, यावर देखरेख ठेवण्यासाठी सरकारने अद्याप त्रिसदस्यीय समिती स्थापन केलेली नाही. त्यामुळे सरकार उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करीत असल्याचा आरोप याचिकाकर्त्या स्वाती पाटील यांनी केला आहे. सोमवारी मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.पाटील म्हणाल्या की, राज्य सरकार आणि गोविंदा पथकांमध्ये केवळ गोविंदांचे वय १८ वर्षे आणि थरांची उंची २० फुटांहून अधिक नसावी, या मुद्द्यावर चर्चा सुरू आहे. मात्र याशिवाय उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशात गोविंदाच्या सुरक्षेसाठी जमिनीवर गाद्या अंथरणे, सेफ्टी बेल्ट, हेल्मेट आणि आयोजनस्थळी मोबाइल रुग्णवाहिकेची सक्ती करण्यात आली आहे. मात्र या गोष्टींकडे सरकार आणि आयोजक सररास दुर्लक्ष करीत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे या सर्व नियमांची अंमलबजावणी होतेय की नाही, यावर देखरेख ठेवण्यासाठी त्रीसदस्यीय समिती स्थापन करण्याचे आदेश दिले होते. मात्र या आदेशाला केराची टोपली दाखवून न्यायालयाचा अवमान करण्यात येत आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार केवळ मुंबईतच नव्हे, तर संपूर्ण राज्यात या नियमांची अंमलबजावणी होण्याची गरज पाटील यांनी व्यक्त केली. पाटील म्हणाल्या की, गोविंदांचे वय आणि थरांची उंची तपासण्यासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्याचे न्यायालयाचे आदेश आहेत. या समितीमध्ये स्थानिक पोलीस ठाण्याचा अधिकारी, नगरसेवक किंवा समकक्ष लोकप्रतिनिधी आणि सहायक पालिका अधिकारी यांचा समावेश करायला हवा. ही समिती नियमांचे कितपत पालन होत आहे, याचा अहवाल सरकारला सादर करेल. मात्र कुठल्याही नियमाचे पालन झालेले नाही. त्यामुळे गोविंदांच्या सुरक्षेसाठी सरकारने तत्काळ पावले उचलावीत, असे आवाहन त्यांनी केले आहे. (प्रतिनिधी)बक्षिसांच्या रकमेची चौकशीलाखो रुपयांच्या हंड्यांचे आयोजन करत कोट्यवधींची उलाढाल करणाऱ्या आयोजकांजवळील निधीची चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने धर्मादाय आयुक्तांना दिले आहेत. मात्र त्याबाबत चौकशी झाली का, यासंदर्भातही सरकारने भूमिका स्पष्ट केली नसल्याचा आरोप पाटील यांनी केला.गोविंदांसाठीच भांडतेय : चार आणि पाच थर लावणाऱ्या गोविंदांनाही बक्षिसे मिळावीत, म्हणून भांडत असल्याचे पाटील यांनी सांगितले. सध्या केवळ ८ ते १० थर रचणाऱ्या पथकांना रोख बक्षिसे मिळत आहेत, तर ३, ४ आणि ५ थर रचणाऱ्या पथकांना केवळ हारतुरे दिले जात आहेत. त्यामुळे हा लढा ‘कमी थर रचून संस्कृती जपणाऱ्या गोविंदां’साठी असून, सणांचे इव्हेंट करणाऱ्यांविरोधात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
त्रिसदस्यीय समितीला मुहूर्त कधी?
By admin | Published: August 23, 2016 6:05 AM