मीरा रोड : राईगावातील ब्रह्मदेव मंदिर व उत्तनच्या धावगी येथील धार्मिकस्थळाची संरक्षक भिंत बेकायदा म्हणून पोलीस बंदोबस्तात तोडणाऱ्या मीरा भार्इंदर महापालिकेकडुन व्हाईट हाऊस या बेकायदा बारच्या बांधकामावर कारवाईसाठी नेलेले पोकलेन बांधकाम न तोडताच माघारी फिरले. महापालिकेच्या घनकचरा प्रकल्पासाठी दिलेल्या जागेत एका धार्मिक स्थळाच्या आड मोठी दगडी कुंपणभिंत बांधून अतिक्रमण केले होते. शनिवारी पालिका अधिकाऱ्यांनी ती जमीनदोस्त केली. त्याच दिवशी राई गावातील कस्टम चाळी जवळ असलेले छोटेसे ब्रह्मदेवाचे मंदिर बेकायदा म्हणून पाडण्यात आले. भार्इंदर पोलीस ठाण्यासमोरील रहदारीला अडथळा ठरणारे बेकायदा धार्मिक स्थळ पाडण्यास मात्र मोठा विरोध झाल्याने कारवाई बारगळली. याआधीही पालिकेने रस्त्यात अडथळा ठरणारी धार्मिकस्थळे पाडली. न्यायालय व सरकारचा आदेश पुढे करुन धार्मिकस्थळे तोडणाऱ्या महापालिकेने मीरा रोड येथील बेकायदा बारच्या बांधकामावर कारवाईसाठी पथक जाऊनही हात हलवत परतले. श्रीकांत जिचकार चौकाच्याजवळ व्हाईट हाऊस नावाचा एक मजली बार असून तो बेकायदा आहे. तसा निर्णय मीरा रोड प्रभाग अधिकऱ्यांनी रीतसर सुनावणी घेऊन दिला आहे. या बांधकामाबाबत ५ डिसेंबर २०१५ मध्ये सुनावणी झाली. त्यावेळी भाडेकरुचे वकील होते. पण मालक मिनाक्षी सिंग न आल्याने त्यांना २३ डिसेंबर व २० जानेवारी २०१६ मध्ये नोटीसा बजावल्या. अखेर २७ जानेवारीला सुनावणी घेण्यात आली असता तेव्हाही सिंग आल्या नाहीत. जानेवारीत सुनावणी झाली असताना बांधकाम बेकायदा असल्याचा निर्णय मात्र तब्बल तीन महिन्यांनी म्हणजेच १८ मे २०१६ ला देण्यात आला. बांधकाम बेकायदा ठरवूनही ते पाडलेले नाही. अखेर ५ नोव्हेंबरला बार तोडण्याचा मुहूर्त सापडला. पालिकेचे तत्कालिन प्रभाग अधिकारी स्वप्नील सावंत व विद्यमान अधिकारी जगदीश भोपतराव पालिका पथक व पोलिसांसह बार तोडण्यासाठी गेले. पण बराच वेळ सिंग यांनी बोलण्यात वेळकाढूपणा केल्यानंतर महानगर गॅसची लाईन असल्याचे कारण पुढे करत पालिका पथक पोकलेन सह कारवाई न करताच माघारी फिरले. नागरिकांनी याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. (प्रतिनिधी)
बेकायदा बारवर हातोडा केव्हा?
By admin | Published: November 08, 2016 2:15 AM