पुणे : कडेकोट पोलीस बंदोबस्तात साहित्यिक राम गणेश गडकरी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. गडकरी यांच्या स्मृतिदिनानिमित्त विविध संस्थांच्या वतीने संभाजी उद्यानात गडकरी यांचा पुतळा पाडला त्याच ठिकाणी सोमवारी हा कार्यक्रम घेण्यात आला. ‘राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असलेल्या महापालिकने पळपुटेपणा केला, आमची सत्ता आल्यावर आम्ही पुतळा बसवूच,’ असे या वेळी भाजपाच्या आमदार मेधा कुलकर्णी यांनी ठणकावून सांगितले. गडकरी यांचा पुतळा उखडून टाकल्याच्या पार्श्वभूमीवर संभाजी उद्यानात हा कार्यक्रम आयोजिण्यात आल्यामुळे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नाट्य परिषदेची कोथरूड शाखा, संवाद, महाराष्ट्र साहित्य परिषद, कथा भारती, रमाबाई आंबेडकर संस्था व अन्य काही संस्थांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमासाठी विविध नाट्यकलावंत तसेच साहित्यप्रेमी उपस्थित होते. गडकरी यांच्या प्रतिमेस अभिवादन करून त्यांच्या विविध रचनांचे तसेच नाट्यप्रवेशांचे या वेळी वाचन करण्यात आले. आमदार कुलकर्णी म्हणाल्या, ‘‘पुतळा उखडणाऱ्यांनी गडकरींच्या साहित्याचे वाचन करावे. कार्यक्रमासाठी पोलिसांनी परवानगी दिली तशीच पालिकेच्या उद्यानखात्यानेही परवानगी दिली होती, मात्र नंतर त्यांनी ती नाकारली. त्यामुळे हा कार्यक्रम आम्ही रस्त्यावर घेत आहोत. आम्ही त्यांना घाबरत नाही. या वर्षीच नाही तर गेली अनेक वर्षे आम्ही गडकरी यांच्या स्मृतिदिनी विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत असतो. त्यामुळे याच वर्षी कार्यक्रम केला, या टीकेत काही तथ्य नाही.’’ कार्यक्रमाला ज्येष्ठ नाट्यसमीक्षक डॉ. वि. भा. देशपांडे, नाटककार श्रीनिवास भणगे, मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, अभिनेते योगेश सोमण, प्रवीण तरडे, आचार्य अत्रे यांच्या साहित्याचे अभ्यासक सुहास बोकील, प्रदीप निफाडकर, शाम भुर्के, अनिल गोरे, आदी मान्यवर तसेच साहित्यप्रेमी या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.पोलिसांच्या गराड्यातच गडकरी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला व नंतर त्यांच्या साहित्याचे वाचन करण्यात आले. (प्रतिनिधी)
सत्ता आल्यावर गडकरींचा पुतळा बसवूच
By admin | Published: January 24, 2017 2:44 AM