गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात घडत असलेल्या घडामोडींमुळे मोठ्या राजकीय उलथापालथीचे संकेत मिळत आहेत. राज्यातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्ट कधीही निकाल सुनावण्याची शक्यता, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षावरील नियंत्रणासाठी सुरू असलेली चढाओढ यामुळे पुढच्या काही दिवसांत काय घडेल याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. यादरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं एक विधान चर्चेत आहे. तसेच त्यावरून चर्चांना उधाण आलं आहे.
''मी पुन्हा येणार. मी पुन्हा येईन म्हटलं की, मी येतोच. मी कसा येतो हे तुम्हालासुद्धा माहिती आहे. आपलं कुलदैवत नरसिंह आहे, आपण कुठूनही प्रगती करू शकतो, असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. कोल्हापूरमधील चंदगड येथे एका कार्यक्रमात संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी हे विधान केलं आहे. या विधानाचे आता वेगवेगळे राजकीय अर्थ काढले जात आहेत.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईन, अशी घोषणा दिली होती. त्यावरून खूप चर्चाही झाली होती. मात्र नंतर घडलेल्या नाट्यमय राजकीय घडामोडींदरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या पाठिंब्याच्या जोरावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र बहुमतासाठी आवश्यक संख्याबळ न जमल्याने त्यांना मुख्यमंत्रिपद सोडावे लागले होते.
त्यानंतर गतवर्षी एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री बनतील, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र त्यावेळी एकनाथ शिंदेंकडे मुख्यमंत्रिपद सोपडवण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतल्याने फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदापासून वंचित राहावे लागले होते. मात्र आता फडणवीस यांनी पुन्हा एकदा मी पुन्हा येईन म्हटलं की, मी येतोच, असं विधान केल्याने पुन्हा चर्चांना तोंड फुटले आहे.